पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : देशात कोरोना महारोगराईची लाट पुर्णत: ओसरली आहे. पंरतु, चीनसह यूरोपमधील काही देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने सर्तकता बाळगण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि.१८) दिवसभरात २ हजार ७५ कोरोनाबाधितांची भर पडली. तर,७१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान ३ हजार ३८३ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशात केवळ २७ हजार ८०२ (०.०६%) सक्रिय कोरोनाबाधित आहेत. तर, ४ कोटी २४ लाख ६१ हजार ९२६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख १६ हजार ३५२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
शनिवारी (दि.१९) देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७३% नोंदवण्यात आला. तर, आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.४१ आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.५६ टक्के नोंदवण्यात आला. गेल्या एका दिवसात आसाम आणि तामिळनाडू राज्यात एकही कोरोनामृत्यूची नोंद घेण्यात आली नाही. आसाममध्ये शुक्रवारी ४ तर, तामिळनाडूत ६१ कोरोनाबाधित आढळले.देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८१ कोटी ४ लाख ९६ हजार ९२४ डोस देण्यात आले आहेत. १२ ते १४ वयोगटातील ११ लाख मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत २ कोटी १६ लाख ६० हजार ६३७ बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच सहव्याधी असलेल्या ६० वर्षांहून अधिक वयोगटातील वृद्धांना देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८३ कोटी ३१ लाख ७७ हजार ६० डोस पैकी १७ कोटी १५ लाख ४५ हजार ७६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. कोरोना तपासण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये कमी झाल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी (दि.१८) दिवसभरात ३ लाख ७० हजार ५१४ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत ७८ कोटी २२ लाख २८ हजार ६८५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.