Russia-Ukraine War Updates : युक्रेनला आणखी एक मोठा धक्का, रशियाच्या गोळीबारात प्रसिद्ध बॅले डान्सरचा मृत्यू | पुढारी

Russia-Ukraine War Updates : युक्रेनला आणखी एक मोठा धक्का, रशियाच्या गोळीबारात प्रसिद्ध बॅले डान्सरचा मृत्यू

कीव्ह; पुढारी ऑनलाईन

Russia-Ukraine War Updates : रशियाकडून युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच आहेत. शुक्रवारी रशियन सैन्याने कीव्ह शहरातील निवासी भागांवर केलेल्या रॉकेट हल्ल्यांत युक्रेनमधील प्रसिद्ध अभिनेत्री ओक्साना श्वेत्स (वय ६७) यांचा मृत्यू झाला होता. या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर आता रशियाच्या हल्ल्यात एका प्रसिद्ध बॅले डान्सरचा मृत्यू झाला आहे. आर्टिओम डॅटसिशिन (Ukrainian ballet dancer Artyom Datsishin) असे त्यांचे नाव आहे. तीन आठवड्यांपूर्वी रशियन सैनिकांच्या गोळीबारात जखमी झालेल्या डॅटसिशिन यांचे गुरुवारी निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते, असे वृत्त एका न्यूज पोर्टलने दिले आहे.

Artyom Datsishin हे युक्रेनच्या नॅशनल ऑपेरामध्ये प्रमुख नर्तक होते. पण रशिया- युक्रेन संघर्षात त्यांना जीव गमवावा लागला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या मते, युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून सुमारे ६०० नागरिक मारले गेले आहेत आणि १ हजारहून अधिक जखमी झाले आहेत. पण प्रत्यक्षात जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

याआधी रशियाच्या रॉकेट हल्ल्यांत (Russia-Ukraine War Updates) युक्रेनच्या प्रसिद्ध अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू झाला होता. श्वेत्स या युक्रेनमधील यंग थिएटर कम्युनिटीच्या सदस्य म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या. युक्रेनमधील कलाकारांसाठीच्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. यंग थिएटर कम्युनिटीने फेसबुक पोस्टद्वारे या घटनेला दुजोरा दिला आहे. आमच्या मातृभूमीवर आलेल्या शत्रूला कोणतीही क्षमा नाही, असे या पोस्टद्वारे स्पष्ट करतानाच यंग थिएटर कम्युनिटीने श्वेत्स यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या २३ व्या दिवशी रशियन फौजांनी सुरक्षित समजल्या जाणार्‍या पश्चिम युक्रेनमधील विविध प्रांतावरही हल्लाबोल केला. लवीव विमानतळावर रशियन फौजांनी हल्ला केला. या हल्ल्यात विमानतळाच्या इमारतीचे नुकसान झाले आहे; पण विमानतळ सुरक्षित आहे, अशी माहिती लवीवच्या महापौरांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Back to top button