पुढारी ऑनलाईन डेस्क: : दाेन तरुणांनी लोकसभेत बुधवारी (दि.१३) घुसखोरी केली. या घटनेचे तीव्र पडसाद आज (दि.१४) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान संसद सुरक्षाभंग प्रकरणावरून संसदेत गदारोळ घातल्याने काँग्रेसच्या ९ तर इतर पक्षातील अशा एकूण १५ खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल काँग्रेस खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. (Congess MPs Suspended)
बुधवारी (दि.१३) संसद सुरक्षा भंग झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच गदारोळ सुरू झाला. विरोधी पक्षाच्या काँग्रस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत, सभागृहात गदारोळ घातला. दरम्यान "अनियमित वर्तन" केल्याबद्दल काँग्रेसच्या पाच खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेच्या निलंबित खासदारांमध्ये डीन कुरियाकोसे, हिबी इडन, जोथिमनी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांच्यासह इतर काही खासदारांचा समावेश आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील उर्वरित सत्रासाठी हे खासदार निलंबित असणार आहेत.
यापूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. या कारवाईमुळे विरोधी पक्षातील सदस्यांविरुद्ध करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या यादीत भर पडली आहे, असे इंडिया टुडेने म्हटले आहे. (Congess MPs Suspended)
बुधवार, १३ डिसेंबर रोजी लोकसभा सभागृह सुरक्षा भंगाच्या प्रकार घडला. यावर आज विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झालेले दिसले. त्यांनी सत्ताधारी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केली. प्रचंड गदारोळ झाला. अखेर लोकसभा अध्यक्षांनी लाेकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. (Congess MPs Suspended)
लोकसभेचं कामकाज सुरू असताना काही तरुणांनी बुधवारी (दि. 13) घुसखोरी करुन घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. या तरुणांवर संसदेचे सुरक्षा कडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील (UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( Parliament Security Breach ) संसदेच्या सुरक्षेचा भंग, अतिक्रमण, सार्वजनिक कार्यात सार्वजनिक सेवकांना अडथळा आणणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "काल घडलेल्या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. लोकसभा अध्यक्षांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्या सर्व खासदारांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे संसदेत अराजकता निर्माण करणे योग्य नाही, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा