पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी दाेन तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू होताच, संसद सुरक्षेवरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली हाेती. या घटनेचे तीव्र पडसाद आज ( दि. १४ ) लोकसभेत उमटले. सुरक्षा त्रुटीवरुन विराेधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारविराेधात घाेषणाबाजी केली. यामुळे प्रचंड गदारोळ झाला. अखेर लोकसभा अध्यक्षांनी लाेकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. (Parliament Winter Session)
बुधवार, १३ डिसेंबर राेजी लोकसभा सभागृह सुरक्षा भंगाच्या प्रकार घडला. यावर आज विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झालेले दिसले. त्यांनी सत्ताधारी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केली. (Parliament Winter Session)
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, "बुधवारी (दि.१३) संसद सभागृहात जे काही घडले त्याबद्दल आपण सर्वजण चिंतित आहोत. सभागृहाची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी आहे." यावेळी विरोध पक्षांच्या सदस्यांनी घाेषणाबाजी सुरुच ठेवली. अखेर लाेकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी दाेन पर्यंत तहकूब केले. (Parliament Winter Session)
लोकसभेचं कामकाज सुरू असताना काही तरुणांनी बुधवारी (दि. 13) घुसखोरी करुन घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. या तरुणांवर संसदेचे सुरक्षा कडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील (UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( Parliament Security Breach ) संसदेच्या सुरक्षेचा भंग, अतिक्रमण, सार्वजनिक कार्यात सार्वजनिक सेवकांना अडथळा आणणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिन बुधवारी होता. याच दिवशी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या. लोकसभेमध्ये दुपारी एकच्या सुमारास शून्यकाळ सुरू असताना घुसखोरीचा प्रकार घडला. (Parliament Attack) दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेतील अक्षम्य चुकीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. लोकसभा सचिवालयाने सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयानेही संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून हे आदेश देण्यात आले आहेत. अनिश दयाळ सिंग, DG, CRPF यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत," गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.