पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'तेज' महाचक्रीवादळाने बाष्प ओढून घेतल्याने राज्यातील हवा कोरडी झाली आहे. त्यामुळे मंगळवारपासून किंचित थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, तेज महाचक्रीवादळाचा बुधवारी वेग कमी होत ते रात्री येमेनकडे सरकणार आहे.
गेले दोन दिवस दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात तेज चक्रीवादळाने महासागरच ढवळून काढला. समुद्र खवळल्याने तेथे 25 पर्यंत मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे राज्यात पाऊस आला नाही. मात्र, हवेतील आर्द्रता ओढून नेल्याने वातावरण शुष्क व कोरडे झाले. त्यामुळे थंडीची किंचित चाहूल मंगळवारपासून जाणवू लागली.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून येत्या 12 तासांत त्याची तीव्रता वाढणारआहे. ते वादळ उत्तरेला सरकत प. बंगाल व बांगलादेशला धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण प. बंगालमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ऐनभरात आलेल्या दुर्गापूजा उत्सवावर पावसाचे सावट पसरले आहे. सोमवारी दुपारनंतर हामून चक्रीवादळ आकाराला आले. ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, द. आसाम व मेघालय या राज्यांतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा