सोनं घ्या, सोनं… विजयादशमी दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात? जाणून घ्या पौराणिक कथा | पुढारी

सोनं घ्या, सोनं... विजयादशमी दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात? जाणून घ्या पौराणिक कथा

मेधा सोमण

आज मंगळवार! विजयादशमी दसऱ्याचा सण आहे. नवरात्र संपले… आता दसरा उजाडला. विजयादशमी दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आहे. या दिवशी शुभकार्याला सुरुवात करतात. सोने खरेदी करण्याचीही प्रथा आहे…

पौराणिक कथा : दुर्गासुर राक्षसाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घेतले. ‘मला त्रैलोक्याचे राज्य मिळावे’ असा वरही त्याने ब्रह्मदेवाकडून मिळवला तसेच ‘पुरुषाचे हातून मृत्यू देणार नाही’ असाही वर मिळवला. दुर्गासुर हे दोन वर मिळताच सर्वांना त्रास देऊ लागला. शेवटी त्याने इंद्राविरुद्ध लढाई पुकारली; परंतु शुक्राचार्य याचा सेनापती असल्याने तो मेलेल्यांनाही संजीवनी विद्येच्या जोरावर जिवंत करी. दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले. इंद्राचाही त्याने पराभव केला आणि नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जिंकण्यासाठी त्याने आपला मोर्चा वळावला. सर्वच घाबरले. दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मृत्यू येणार नव्हता. शेवटी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना करण्यात आली. ‘विजया’ हे नाव धारण करून ती शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महादक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी ५६ कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलेमा, दुर्धर, दुर्मुख, बिडाळ यांच्यासारख्या बलाढ्य राक्षसाला तिने ठार मारले. त्यामुळे ताळजंव राक्षस संतापला. त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला. विजयादेवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. शेवटी घनघोर लढाई करून विजयादेवीने विजय मिळवला. ही लढाई नऊ दिवस चालली होती. दहाव्या दिवशी जय मिळाल्याने विजयादशमीच्या स्मरणार्थ या दिवसाला ‘विजयादशमी’ हे नाव मिळाले.

प्रभू रामचंद्रानी रावणाला अश्विन शुक्ल दशमीच्याच दिवशीच ठार मारले म्हणून दसरा साजरा केला जातो. रावणाची दहा शिरे तुटून जमिनीवर पडली म्हणून या दिवसाला ‘दशहरा दसरा’ असे म्हणतात. एकदा पार्वतीने शंकराला विचारले की ‘देवाधिदेव लोकांच्यात
विजयादशमीचा सण प्रचलित आहे. हा सण साजरा केल्याने कोणते फळ मिळते?’

भगवान शंकर म्हणाले, ‘देवी, अश्विन शुक्ल दशमीच्या दिवशी नक्षत्रांच्या उदयाच्या वेळी विजय नावाचा मुहूर्त असतो. या वेळी इच्छा केलेली आणि कार्यारंभ केलेली सर्व कार्ये सिद्धीस जातात. म्हणूनच या दिवशी लोक शुभकार्याचा संकल्प आणि प्रारंभ करतात.

या दिवशी या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारले. रजपूत लोक या दिवशी मोहिमांना प्रारंभ करून मोहिमा यशस्वी करीत असत. अर्जुन | अज्ञातवासात असताना त्याने आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. ती त्याने दसऱ्याच्या दिवशी काढून घेतली. विराटाच्या गाई पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून त्याने विजय मिळवला. विजयादशमी हा लष्करी सण आहे. शौर्य, संपत्ती आणि विद्या देणाऱ्या श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वतीच्या वरदानाचे प्रतीक म्हणून या दिवसाला मोठे महत्त्व मिळाले आहे. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, शस्त्रपूजन आणि अपराजिता पूजा हे चार महत्त्वाचे विधी सांगितले आहेत. या दिवशी सैन्य लढाईसाठी गावाची सीमा ओलांडून आहेर पडत असे. वाटेत शमी वृक्षाची पूजा केली जाई.

कथा सुवर्णमुद्रांची पैठण नगरात देवदत्त नावाचा माणूस रहात होता. – त्याला कौत्स्य नावाचा एक मुलगा होता. या मुलाने वरतंतु नामक ऋषींकडे राहून विद्यार्जन केले. विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरूने आपल्याकडून दक्षिणा घ्यावी, अशी त्यांची इच्छा होती. त्याचा फारच आग्रह पडल्यामुळे त्याचा गुरू म्हणाला, ‘तुझा एवढा आग्रहच आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणि त्याही एकाच माणसाकडून पाठवून दे.’

परंतु, एकाच माणसाकडे एवढे द्रव्य मिळणे कठीण होते. रघुराजा उदार होता. परंतु, त्याच्याकडे एवढे द्रव्य नव्हते. तीन दिवसांत सुवर्णमुद्रा देण्याचे राजाने कौत्स्याला आश्वासन दिले. ही गोष्ट इंद्राला समजताच त्याने अयोध्यानगराबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्रा कौत्स्याला दिल्या आणि उरलेल्या ठेवून त्याने लोकास त्या नेण्यास सांगितल्या. लोकांनी या वृक्षांची पूजा करून ते सोने लुटले. म्हणून दसऱ्याच्या दिवशी शमी व आपट्याची पूजा करून पाने एकमेकांस देण्याची पद्धत पडली. या कथेमध्ये लोकांना सुवर्णमुद्रा लुटण्यास सांगितले. झाडांची पाने नव्हे. सध्या दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याच्या झाडाची पाने एकमेकांना देतो हे योग्य नव्हे. त्यामुळे या झाडांची दसऱ्याच्या दिवशी कत्तल होते हे योग्य नाही. पर्यावरणाकडे लक्ष द्यावयासच हवे.

प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. आपण आपल्या मनातील षड्रिपूंना नियंत्रणात ठेवले पाहिजे. सध्या समाजात भ्रष्टाचार मोकाट सुटले आहे. त्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी प्रत्येकात प्रभू रामचंद्र अवतरले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने दसरा आपण साजरा केला असे म्हणता येईल.

श्री तुळशीची आरती

जय देवी जय देवी जय माये तुळशी । निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन | हें तुळशी ||धृ|| ब्रह्मा केवळ मुळ मध्ये तो शौरी। अंग्री शंकर तीर्थे शाखा परिवारी। सेवा करिती भावे सकळहि नरनारी । दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी || १ || जय देवी || शितळ छाया भूतल व्यापक तूं कैसी। मंजरीची आवड | कमलारमणासी । तव दलविरहीत विष्णू राहे उपवासी । विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमांसी ॥२॥ जय देवी || अच्युत माधव केशव पीतांबरधारी । तुझे पूजनकाळीं जो हे उच्चारी । त्यासी देसी संतति संपत्ती सुखकारी । गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ।।३।। जय देवी ।।

श्री गंगेची आरती

माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरसी। हरिसी पातक अवघें जग पावन करिसी । दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी। हरहर आता स्मरतों गति होईल कैसी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय गंगाबाई । पावन करिं मज सत्वर विश्वाचे आई ||धृ|| पडले प्रसंग तैशी कर्मे आचरलो । विषयांचे मोहानें त्यांतचि रत झालों । त्याचे योगे दुष्कृतसिंधूंत बुडालों । त्यातुनि मजला तारिसी या हेतूने आलों ||२|| जय देवी || निर्दय यमदूत या समयीं राखीं । क्षाळी यमधर्माच्या खात्यांतिल बाकी । मत्संगति जन अवघे तारियले त्वां कीं । उरलो पाहें एकचि मी पतितांपैकी ||३|| जय देवी || अघहरणे जयकरुणे विनवितसे भावें । नोपेक्षी मज आतां त्वत्पात्री घ्यांवे। केला पदर पुढे मी मज इतुकें द्यावे । जीवें त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावे ||४|| जय देवी ||

हेही वाचा

Back to top button