पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाणपूल ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक या 4.414 किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रोसेवेचा विस्तार करण्यास केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी आवास मंत्रालयाने अखेर सोमवारी (दि.23) अंतिम मान्यता दिली आहे. या निर्णयाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात 'पुढारी'ने सातत्याने पाठपुरावा करीत वृत्त प्रसिद्ध केले आहे. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महामेट्रोने तयार करून पिंपरी-चिंचवड महापालिकेस दिला होता.
त्यानंतर महापालिका व राज्य शासनाकडून मंजूर करून केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. केंद्र 20 टक्क्यांऐवजी 10 टक्के निधी देणार आहे. उर्वरित निधीचा भार राज्य व महापालिका उचलणार आहे. आराखड्यात काही त्रुटी काढून केंद्राने सुधारित फेरप्रस्ताव सादर करण्यास कळविले होते. त्यानुसार महापालिका व राज्य शासनाने मंजुरी देऊन सुधारित प्रस्ताव पाठविला होता. अखेर दोन वर्षांनी केंद्राने सोमवारी मंजुरी दिली आहे.
हा मार्ग पूर्णपणे एव्हिलेटेड (उन्नत) असून, तो पिंपरी ते निगडी असा सर्व्हिस रस्त्याने जाणार आहे. या मार्गासाठी एकूण 910 कोटी 18 लाख खर्च आहे. महामेट्रोने हे काम जलद करण्यासाठी जनरल कन्सल्टन्स नेमण्यासाठी तसेच या प्रकल्पाचा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट बनविण्यासाठी निविदा आधीच काढल्या आहेत. लवकरच या मार्गिकेच्या स्थापत्य, विद्युत व सिग्नल या कामाची निविदा काढण्यात येणार असून, ठेकेदारांच्या नेमणुका करण्यात येतील. प्रत्यक्षात काम येत्या तीन ते चार महिन्यांत सुरू होईल.
पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी) ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक हा विस्तारित मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे भाग मेट्रो नेटवर्कला जोडले जातील. त्या परिसरात राहणार्या लाखो नागरिकांना याचा फायदा होईल. महामेट्रो हे काम नियोजित वेळेत 3 वर्षे 3 महिन्यांत पूर्ण करेल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
पिंपरी ते निगडी या मेट्रोच्या मिसिंग लिंकला केंद्राची मान्यता मिळणे, ही नवरात्र व दसरा सणानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना मोठी भेट आहे. चिंचवड, आकुर्डी व निगडी ही तीन ठिकाणे या मार्गामुळे मेट्रोशी जोडली जाणार आहेत. नागरिकांना मेट्रोतून प्रवास करणे सुलभ होणार आहे. या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शहरवासीयांना फायदा होणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि शेजारील पुणे शहरातील नागरिकांना प्रवासाचा अधिक सुरक्षित व सोयीचा मार्ग निर्माण होणार आहे. या मार्गाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि खासदार, आमदार व सर्व लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा