Raigad Crime | माणुसकीला काळीमा! ‘अनुकंपा’ नोकरीसाठी भावाने दोन बहिणींना सूपमधून विष देऊन मारले

Raigad Crime | माणुसकीला काळीमा! ‘अनुकंपा’ नोकरीसाठी भावाने दोन बहिणींना सूपमधून विष देऊन मारले
Published on
Updated on

अलिबाग, पुढारी वृत्तसेवा : अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी उच्चशिक्षित मोठ्या भावाने दोन सख्ख्या बहिणींना विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील चौल भोवाळे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी भावास अटक केली आहे. गणेश शंकर मोहिते असे त्याचे नाव आहे. सोनाली (वय 34) आणि स्नेहल (30) अशी मृतांची नावे आहेत. (Raigad Crime)

संबंधित बातम्या

शंकर मोहिते हे वनविभाग अधिकारी म्हणून सेवेत होते. सेवेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ते सन 2009 मध्ये मृत झाले. त्यानंतर त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून त्यांच्या पत्नी जयमाला यांनी सोनाली आणि स्नेहलच्या नावाची शिफारस केली. त्यावरून मुलगा गणेशने वाद सुरू केला होता. गणेशची वर्तणूक चांगली नव्हती व त्यांच्या खोट्या सह्या करून तो बँकेतून पैसे काढत होता. वडिलांच्या नावावर असलेले घरही त्याने स्वतःच्या नावावर करून घेतले होते. त्यामुळे किमान मुलीला तरी नोकरी मिळावी, असे आईचे मत होते. यावरून संतापलेल्या गणेशने सोनाली व स्नेहल या दोघींना सुपमधून विष दिले.

नेमकं काय घडलं?

१६ ऑक्टोबर रोजी ६:३० वाजण्याच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटल अलिबाग येथून रेवदंडा पोलीस ठाणे यांना माहिती मिळाली की, सोनाली शंकर मोहिते (वय ३४ वर्ष, रा. भोवाळे, पो. चौल, ता. अलिबाग) ही मयत झाली आहे. त्यानंतर शवविच्छेदन करून तिचे प्रेत अंत्यविधीकरिता वारस भाऊ गणेश मोहिते यांच्या ताब्यात देण्यात आले. गणेश मोहिते याने दिलेल्या फिर्यादीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तिच्या मृत्यूप्रकरणी चौकशीत असे आढळून आले की, सदर मयत महिलेचा मृत्यू जेवणातील विषबाधेमुळे झाला आहे.

१७ ऑक्टोबर रोजी भाऊ गणेश मोहिते याने त्याची दुसरी बहीण स्नेहा शंकर मोहिते (वय ३० वर्ष) हिला देखील उलट्याचा त्रास होत असल्याने तिला सिव्हील हॉस्पिटल अलिबाग येथे उपचाराकरिता दाखल केले. पण तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. तिचा २० ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. ती मयत होण्यापूर्वी रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रावरून सदर मुलीचा मृत्युपूर्व जबाब नोंद केला. तिने तिच्या जबाबात सांगितले की, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८:१५ वाजता ती व तिची मोठी बहीण सोनाली यांना तिचा भाऊ गणेश याने सूप बनवून आणून २ प्लेटमध्ये त्यांना पिण्यास दिले व त्यांच्या आईने तांब्यात पाणी पिण्यास दिले होते. सदर पाणी हे स्वतः व मयत बहिणी प्यायल्या होत्या.

२० ऑक्टोबर रोजी सदर मयत मुलीची आई जयमाला मोहिते (वय 56 वर्ष) हिने रेवदंडा पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली की, त्यांचे नातवाईक (भावकीतील लोक) यांच्यामध्ये बऱ्याच वर्षापासून मालमत्तेच्या वादातून भांडण चालू आहे. तिच्या मयत मुलींना तिचा मुलगा गणेश याने सूप दिल्यानंतर पाणी पिण्यासाठी तांब्या भरून ठेवला होता. सदरचे पाणी मुली पीत होत्या. सदरचे पाणी तिने घराबाहेर ठेवले होते. त्यावेळी भावकीतील लोकांनी मारण्याच्या उद्देशाने बाहेर ठेवलेल्या पाण्यात विष टाकले असावे त्यामुळेच तिच्या मुलींचा मृत्यू झाला असावा, असे सांगत तिने अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचे गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली. त्यावरून २० ऑक्टोबर रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात रोजी भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

२१ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतूल झेंडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्यावरून बाळासाहेब खाडे व तपास पथकाने सदर घटनेबाबत सखोल चौकशी केली. सदर चौकशीमध्ये असे आढळून आले की मयत मुलींचे वडील हे वनविभाग अधिकारी म्हणून सेवेत होते. ते २००९ मध्ये मयत झाले. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणेबाबत मयत मुलींच्या आईने तिच्या मुलींना सदरची नोकरी मिळावी व मुलाला मिळू नये, असा पत्रव्यवहार केला होता. याबाबत त्यांचे बऱ्याच वर्षांपासून घरात मयत मुली व आई आणि त्यांचा भाऊ यांच्यांमध्ये वाद सुरु होता. (Raigad Crime)

खोट्या सह्या करून बँकेतून पैसे काढले

या प्रकरणाच्या चौकशीमध्ये असे आढळून आले की, त्यांचा मुलगा गणेश मोहिते याची वर्तणूक चांगली नव्हती. त्यांच्या खोट्या सह्या करून बँकेतून पैसे काढत होता. पती मयत झाल्यानंतर पतीच्या नावे असलेले घर गणेश याने आई व मुलींना विश्वासात न घेता स्वत:च्या नावे करून घेतले होते. त्यामुळे त्यांचे अनुकंपावर मुलाला नोकरी न मिळता मुलीला मिळावी असे त्यांचे मत होते.

त्याअनुषंगाने अधिक पडताळणी केली असता सोनालीच्या बॅगमध्ये व घरात फिर्यादी यांनी वनविभागाला आणि पोलीस ठाण्याला मुलाविरुद्ध दिलेल्या तक्रारीचे कागद मिळून आले. त्यावरून मुलगा गणेश याचेकडे सखोल चौकशी केला असता असे आढळून आले की, त्याने आई व मयत बहिणींना काही आश्वासन देवून त्यांच्याकडून नाहरकत घेवून २०२१ साली अनुकंपा तत्वावर नोकरी प्राप्त केली. गेल्या १ वर्षापासून तो, त्यांची आई आणि बहिणी यांच्यासह मौजे पो. भोवाळे, रेवदंडा ता. अलिबाग याठिकाणी राहत होता. त्या तिघींना घेवून त्यांचे घरी गणेशोत्सवाकरिता घेवून आला होता. तेव्हापासून ते आजपर्यत ते तेथेच राहत आहे.

विषारी औषधाच्या माहितीसाठी गुगलवर ५३ वेळा सर्च केले

सदर घटनेबाबत मुलगा गणेश योग्य माहिती देत नसल्याने त्याचेवर संशय वाढला. त्यावरून त्याचा मोबाईल ताब्यात घेवून त्याची पाहणी केली असता मोबाईलची गुगूल हिस्ट्री चेक केली असता त्याने दिनांक ११ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान एकूण ५३ वेळा वेगवगळे विषारी औषधाची माहिती घेण्यासाठी सर्च केल्याचे आढळून आले. त्यामध्ये चव असलेले विष, वास न येणारे विष, तसेच झोपेच्या गोळ्या सदर विषाने किती दिवसात मृत्यू होवू शकतो. इत्यादी बाबी गुगलवर सर्च केल्याचे आढळून आल्या. त्याअनुषंगाने अधिक संशय वाढल्यामुळे तो वापरत असलेली कारची झडती घेतली असता सदर कारच्या डिकीत पिशवीमध्ये RATOL उंदीर मारण्याच्या औषधांची २ माहितीपत्रके पिशव्यामध्ये एका कोपऱ्यात लपवून ठेवल्याचे आढळून आले. अधिक तपास केला असता मयत मुलींचा भाऊ गणेश याने त्यांचे नावावर करून घेतलेले घर, अनुकंपावर नोकरी प्राप्त करून घेत असताना आई व बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांचेत वाद सुरु होता.

सूपमध्ये उंदीर मारण्याचे औषध घातले

दोन्ही मयत बहिणी अविवाहित होत्या. भाऊ गणेश याच्याकडे हिस्साची मागणी करीत होत्या. सर्व कारणावरून त्याने दोन्ही बहिणींना जीवे ठार मारण्याचा निश्चय केला. दोन्ही बहिणीना विश्वासात घेवून दिनांक १५ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांना सूप बनवून पिण्यासाठी दिले. त्या सूपमध्ये दोघींना वेगवेगळ्या दोनप्लेट मध्ये RATOL उंदीर मारण्याचे औषध घालून जीवे ठार मारले असे तपासात निष्पन्न झाले. त्याच दिवशी भाऊ गणेश याला सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर करून २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news