पुणे विभागातील अडखळलेल्या फाइलींना गती देणार : एकनाथ शिंदे

पुणे विभागातील अडखळलेल्या फाइलींना गती देणार : एकनाथ शिंदे

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या अडखळलेल्या विकासकामांच्या फायली वेगाने निकाली काढा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या. यावेळी तीर्थक्षेत्र विकास, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, रिंगरोड, पुणे महानगर विकास प्राधिकरण, शहरातील खड्डे व पिकांचे पंचनामे यांचा आढाव त्यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी घाईत संवाद साधला.

प्रचंडबंदोबस्तात पुण्याच्या विभागीय आयुक्तालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला. सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आढावा बैठक सुरू होती. यावेळी विभागीय आयुक्तालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होेते. कोणालाही त्याठिकाणी प्रवेश दिला जात नव्हता.

फायलींचा वेग वाढवणार..

प्रसार माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, मी विभागवार आढावा बैठकांचे सत्र सुरू केले असून, त्यातील ही तिसरी बैठक आहे. यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे, शेतकर्‍यांसाठी दिली जाणारी मदत, पेरणी आढावा, कर्ज वाटप, धरणांतील पाणीसाठा, सिंचन क्षमता, कोरोनाची स्थिती, बुस्टर डोस आदी विषयाचा आढावा घेतला. पाचही जिल्ह्यातील विकासकामांच्या अडकलेल्या फाइलींना गती कशी देता येईल, यासंदर्भात अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. फायलींचा प्रवास कमी करण्यावर माझे लक्ष असून, त्याचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल.

दोन दिवसांत पंचनामे होणार..

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे महसूल विभागाकडून पंचनामे केले जात असून, पुढील दोन दिवसांत 100 टक्के पंचनामे पूर्ण होतील. एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकर्‍यांना मिळणारी नुकसान भरपाई कमी आहे. ती कशी वाढवता येईल, याकडे लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

'ते' पैसे माझ्यात घरात सापडले काय ?

खासदार संजय राऊत यांच्या घरात ईडीला जी रक्कम सापडली. त्यावर एकनाथ शिंदे असे नाव होते, ते पैसे तुम्ही दिले होते का?, असा प्रश्‍न विचारला असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जे पैसे सापडले आहेत. ते कोणाच्या घरात सापडले? ते त्यांनाच विचारा, मी कसे उत्तर देणार?

लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघे मिळून किती दिवस सरकार चालणार ? या प्रश्‍नावर मुख्यमंत्री म्हणाले, लोकांची कामे होतायेत ना?,आमच्या कामावर जनता खूश आहे, त्यामुळेच आमचा सत्कार होतोय. आम्ही शेतकर्‍यांवर लक्ष केंद्रित केले असून, दिवसरात्र काम करत आहोत, लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार होईल.

आदित्य ठाकरेंच्या प्रश्‍नावर उत्तर टाळले

तुम्ही ज्या भागात जाणार आहात, त्याच भागात शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची सभा आहे ? या प्रश्‍नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाही आहे. प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, असे म्हणत उत्तर देणे टाळले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news