पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक ऋतुमानानुसार हवामानात बदल होत असतो. याचा परिणाम हा मानवी जीवनावरही होतो. याचा सर्वात पहिला परिणाम मुलांवर होतो. थंड हवा आणि वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ते सारखे आजारी पडू शकतात. म्हणून वेळीच योग्य काळजी घेतल्यास, तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवणे शक्य आहे. कडाक्याच्या थंडीत खालील टीप्स फॉलो करुन तुम्ही मुलांना उबदार वातावरण देवू शकता
थंडीच्या दिवसात मुलांना तहान कमी लागते. शरीरात पाणी कमी जात असल्याने याकडे दुर्लक्ष केल्यास मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. या दिवसात मुले पाणी पितात का?, किती पितात? याकडे पालकांनी आवर्जून लक्ष द्यावे. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्यास शरीर हायड्रेड राहते आणि आरोग्य निरोगी राहते.
हिवाळ्यात मुलांना थंड पाणी देण्याऐवजी कोमट पाणी द्या. कारण मुलांना सर्दी, खोकला आणि ताप यांपासून दूर ठेवते. तुमचे मुल या दिवसात आजारी पडले तरी आजारपणात रोगप्रतिकार वाढण्यास मदत करते. म्हणून या दिवसात कोमट पाणी देणे फायद्याचे ठरते.
हिवाळ्यात त्वचेमधील पाणी कमी झाल्याने त्वचा कोरडी पडते. या दिवसात त्वचा निस्तेज होते. त्यामुळे आंघोळापूर्वी मुलांना तेलाने मसाज करावे. यासाठी मोहरीचे, तिळ, ऑलिव्ह ऑईल आणि बदाम तेलाचा वापर करता येईल. या दिवसाच मालिश केल्याने त्वचा मुलायम, लवचिक आणि निरोगी राहण्यास मदत होते.
सकाळी वातावरणात प्रचंड गारवा असतो, त्यामुळे हिवाळ्यात दररोज पहाटे आंघोळ केल्याने सर्दी होण्याची शक्यता असते. थंडीमुळे जास्त वेळ अंगावर कडक पाणी ओतून घेतल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो. याचा परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे मुलांना जास्त वेळ गरम पाण्यात राहू देऊ नका; पण या दिवसात आंघोळ टाळू नका, कारण या काळात स्वच्छता न ठेवल्यास संसर्ग आणि संसर्गजन्य रोग होऊ शकतात.
थंडी आहे म्हणून मुलांना ब्लँकेट घेऊन झोपलच पाहिजे, असे नाही की थंडी आहे म्हणून मुलांना बाहेर जाऊच न देणं हे पालकांनी टाळले पाहिजे. मुलांना आवश्यक प्रमाणात दैनंदिन कसरती करू द्या. मैदानावर खेळायाला सोडा; पण दरम्यान काळजी देखील घ्या. मुलांना घेऊन पहाटे फिरायला जाणे टाळा. धुके मुलांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. म्हणून सकाळी वातावरणातील धुके कमी झाल्यानंतर फिरायला जावे किंवा हे शक्य नसल्यास, मुलांकडून घरीच हलका व्यायाम करून घ्यावा. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि मुले दिवसभर उत्साही राहतील.
हिवाळ्यात तुमच्या मुलांना निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आहाराही पालकांनी आपल्या मुलांच्या आहारात अशा पदार्थ आणि घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. या दिवसात मुलांच्या रोजच्या आहारात दररोजच्या जेवणासोबत गाजर, बीटरूट, रताळे, मुळा, फळभाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. या दिवसात डाळिंब, सफरचंद आणि संत्री यांसारखी फळे देखील मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
कडाक्याच्या थंडीत मुलांचे संरक्षण करण्यासाठी उबदार, हलके कपडे घाला. या दिवसात स्वेटर, कानटोपी, पायमोजे यांसारखी कपडे मुलांना आवर्जून घाला. मुले शाळेत जाताना श्वास घेण्यायोग्य हलका पोशाख घाला. या दिवसात अवजड कपडे घालणे शक्यतो टाळा.