डॉ. सचिन भिसे
पावसाळ्यात उकाड्यापासून दिलासा मिळत असला, तरी या कालावधीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही आजारी पडू शकते. मुलांना पावसाळा खूप आवडतो; पण आपल्या कुटुंबाचे पावसाळ्यातील रोगांपासून रक्षण करण्यासाठी आपण पालक म्हणून नक्कीच काळजी घेऊ शकतो.
पावसाळा आणि शाळा सुरू होण्याचा कालावधी साधारणत: सारखाच असतो. या ऋतूमध्ये कागदाच्या बोटी तयार करणे, जिभेवर पावसाचे थेंब झेलणे, पाण्याने भरलेल्या डबक्यांमध्ये उड्या मारणे, ढोपरापर्यंत असलेल्या पाण्यातून चालण्याचा आनंद घेणे ही बर्याच मुलांची इच्छा असते.
पावसाची सुरुवात झाल्यावर विषाणूंमुळे येणारा ताप, न्यूमोनिया आणि लेप्टोस्पायरोसिस हे आगंतुक पाहुणेही येतात आणि हा काळ मोठा अवघड होऊन बसतो. तर दूषित पाणी आणि अन्नपदार्थ यामुळे टायफॉईड, हिपेटायटिस टाईप ए, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिस, अतिसार आणि उलट्या यासारखे आजार होतात. त्याचप्रमाणे डास चावल्यामुळे मलेरिया किंवा डेंग्यू होण्याची शक्यता असते.
एवढेच नव्हे, तर सर्दी, ताप, दम्याच्या झटक्यासारखे अॅलर्जीचे विकारही तुमची परिस्थिती अवघड करू शकतात. यापैकी अनेक आजारांना अटकाव करता येत नसला, तरी आपण काही प्रतिबंधात्मक उपाय आणि बिकट अवस्था होऊ नये यासाठी काही उपाययोजना करू शकतो.
घराजवळ किंवा घरात पाणी साचू देऊ नका
स्थिर पाण्यात डासांची पैदास होते. त्याचप्रमाणे तलाव, विहिरी, नद्या, नाले तुडुंब भरल्याने वाहू लागतात. या पाण्यामुळे माणसे आणि जनावरांची विष्ठा गटारीतील पाण्यासोबत रस्त्याच्या कडेला साचते. पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे अशा ठिकाणी डासांची पैदास वाढते. अशा परिस्थितीत तुमची मुले आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता पाळतील, डासविरोधी औषधे वापरतील आणि घराबाहेर पडताना पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करतील याची खातरजमा करावी.
पाणी साठवून ठेवू नये. पाणी साठवून ठेवत असल्यास ते नीट झाकून ठेवावे. त्यामुळे डासांमुळे होणारे विकार होणार नाहीत. त्याचप्रमाणे तुमच्या मुलांना आवश्यक लसी देण्यास विसरू नका.
घरगुती पदार्थ खावेत
दूषित पाण्यामुळे होणारे अतिसार आणि अन्नातून विषबाधा यासारखे आजार पावसाळ्यात सर्रास आढळतात. मुलांनी घरगुती पदार्थ खावेत; कारण बाहेरील खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी कशा प्रकारचे पाणी वापरतात हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे बाहेरील पदार्थ, जंकफूड आणि तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत. तुमच्या मुलाच्या आहारात गरम सूप आणि गरम दुधाचा समावेश करावा. मुलांनी केवळ सकस आणि संतुलित आहार घ्यावा आणि शुद्ध पाणी प्यावे. पालकांनी आहारात लसूण, बदाम, मशरूम, ओट्स, हळद, सूप, बेरीज, सॅल्मनचा समावेश करावा. या पदार्थांमुळे प्रतिकारकशक्ती वाढते. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी उकळून प्यावे.
घरातील तापमान योग्य असावे
पावसाळ्यात तापमानाची खूप चढ-उतार होते. वारा असेल तर थंडावा येतो. अशा प्रकारचा अचानक होणारा वातावरण बदल चिंता वाढवू शकतो आणि तुमच्या मुलाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलांना अॅलर्जी आणि संसर्गांपासून दूर ठेवण्यासाठी घर नेहमी कोरडे आणि घरातील तापमान मध्यम ठेवा. घरातील तापमान थोडे उबदार ठेवण्यासाठी दरवाजे खिडक्या लावून घेऊ शकता. त्याचप्रमाणे दिवसभर तुमच्या मुलाला उबदार ठेवण्यासाठी स्वेटरही घालू शकता.
मुलांनी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखावी
वैयक्तिक स्वच्छता राखावी (खाण्यापूर्वी आणि खाल्ल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुणे, डबक्यांमध्ये न खेळणे, विशेषत: पायाला किंवा हाताला जखम झाली असेल किंवा कापले असेल तर डबक्यांमध्ये खेळणे टाळावे), दुसर्यांसोबत हातरुमाल किंवा टॉवेल शेअर करू नये.
मुसळधार पावसात मुलाला बाहेर खेळण्यास पाठवू नये. कारण, अशाने तुम्ही मलेरिया, टायफॉइड आणि इतर अॅलर्जींना आमंत्रण द्याल. मुलाला रेनकोट आणि वॉटरप्रूफ पादत्राणांसह शाळेत पाठवावे. मूल पावसात भिजले असेल तर त्याचे अंग पूर्ण कोरडे करावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा संसर्ग किंवा त्वचेच्या समस्या टाळता येतील. पावसात भिजून आल्यावर मुलाला गरम पाण्याने अंघोळ घालावी आणि त्यांचे पाय कोरडे करावेत. आजारी असेल तर घरात असतानाही मुलाला मोजे किंवा स्लिपर घालण्याची सवय करावी. मुलाचे कपडे आणि लादी पुसताना विषाणू विरोधी द्रव्यांचा वापर करावा.
प्रथमोपचार किट तयार ठेवावे
सगळी काळजी घेतल्यानंतरही तुमचे मूल आजारी पडण्याची शक्यता असते. सर्दी किंवा फ्लू होऊ शकतो. अशा वेळी सर्दी किंवा खोकल्यावरील औषधांची तयारी करून ठेवावी. डॉक्टरच्या सल्ल्याने या आजारांसाठी कफ सिरप किंवा सर्दी व तापावरील सिरप, बाम या औषधांचा वापर करावा.
बालरोगतज्ज्ञाची वेळोवेळी भेट घ्यावी
पावसाळ्यात होणारे आजार संसर्गजन्य असतात आणि ताप हे त्याचे लक्षण असते. जेव्हा तुम्हाला ताप येतो आणि अंगावर पुरळही येतात, अंग दुखते, डोके दुखते, उलट्या होतात, पोटात दुखते आणि मलेरिया होतो, जुलाब, डोळे व नखे पिवळी होणे ही कावळीची लक्षणे दिसतात, तेव्हा बालरोगतज्ज्ञांची अवश्य भेट घ्यावी. डोळे कोरडे झाले, त्वचा कोरडी झाली, मूत्रविसर्जनाचे प्रमाण कमी झाले, मुले कायम झोपाळलेली असतील आणि नेहमीप्रमाणे सक्रिय नसतील तर बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.