पुढारी ऑनलाईन डेस्क: मोबाईल फोन हा आपल्या जगण्यातला अविभाज्य भाग झाला आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना काळातील लॉकडाउनपासून लहान मुलंच्या हातातही मोबाईल फोन आला. कारणही तसेच होते, मोबाईलवर त्यांचे ऑनलाईन क्लास सुरू झाले. पाहता-पाहता मुलांना मोबाईल फोनशिवाय राहणं ही एक शिक्षाच वाटू लागली. मागील एक वर्षापासून कोरोनाचे महासंकट शमलं. शाळा नियमित सुरू झाल्या तरीही लॉकडाउन काळात मोबाईल वापराची सवयही मुलांच्या अंगवळणी पडली. याचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. मुलांच्या दिवसभर मोबाईल वापरामुळे (Child Mobile Addiction )तुम्ही देखील चिंतेत असाल तर त्यांना ओरडू नका, तर हे उपाय करून पाहा. तुम्हाला तुमच्या मुलाला मोबाईल वापराच्या सवयीतून बाहेर काढायचं असेल तर चला तर मग जाणून घेवूया नेमकं कोणते उपाय करायचे आहेत याविषयी…
मुलांसाठी आई-वडिल हेच आदर्श असतात. त्यामुळे पालकांची कृती हीच मुलांची सवय होते. त्यामुळे मुलांना वाढवताना पालकांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, ते आई-वडिलांकडे बघूनच शिकत असतात. म्हणून सर्वप्रथम पालकांनी मुलांसमोर घरी मोबाईल फोनचा वापर कमी करावा. मुलांना वेळ द्यावा, त्यांच्याबरोबर संवाद साधत मोबाईल ऐवजी वाचन, संगीत ऐकणे आणि खेळांमध्ये मुलांचे मन रमवावे. यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न घेणे गरजेचे आहे. (Child Mobile Addiction )
तुमच्या मुलाला जरी मोबाईल गेमिंगचे व्यसन लागले असले तरी, त्याला एकदम ओरडून त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेऊ नका. असे केल्याने त्याच्यावर वाईट परिणाम होईल. आरडाओरडा करुन मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना दूर नेता येत नाही. मुलांना मोबाईल फोन ऐवजी दुसरे पर्याय द्यावे लागतील. त्यांचे आवडणारे खेळ आणि आवडत्या कृतीवर यावर पालकांनी लक्ष केंद्रीत करावे. मुलांना हळूहळू दुसऱ्या कामात गुंतविल्यास मुलांचा मोबाईल फोनकडील ओढा कमी होण्यास मदत होईल.
मुल जर वेळेपेक्षा अधिक मोबाईलचा वापर करत असेल, तर त्याला मोबाईल स्क्रिन आणि ब्लू किरणांचा चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर होणारे परिणाम आणि नुकसान सांगा. या गोष्टी समजून सांगितल्याने मुलांची मोबाईल वापराची सवय कमी होऊ शकते.
१० वर्षापर्यंतच्या मुलांना मोबाईल देताना पालकांनी त्यांना मोबाईलवर parental controls app सेट करून द्यावे. यामुळे मुल मोबाईलवर आपल्या कामाच्या गोष्टीच पाहू शकेल. जर तुमचे मुल १० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहे तर त्याचा मोबाईल पाहायचा वेळ निश्चित करा. यामुळे मुलांच्या दिवसभर मोबाईल वापरावर मर्यादा येईल आणि हळूहळू मोबाईलची सवय कमी होईल.
जर का मुलाचे मोबाईल वापरणे कमी करायचे असेल तर त्याला इतर कामात गुंतवा. त्याला ज्या कामात आनंद वाटतो त्या कामात त्याचा जास्त वेळ द्यायला भाग पाडा. उदा. त्याला खेळायला आवडतं असेल तर खेळायला सांगा. तसं वातावरण निर्माण करा, तुम्ही त्याच्याशी खेळा. जेणेकरुन त्याचे मोबाईल वरील लक्ष कमी होईल.
तुमच्या मुलाला मोबाईलची सवय लागली आहे. मोबाईल वापरू नका, एवढे सांगून मोबाईल वापर कमी होण्याची शक्यता कमी असते. त्यासाठी. तुम्ही तुमच्या मुलांचा स्क्रिन टाईम कमी करा. एकदम मोबाईलचा वापर बंद करण्यापेक्षा हळूहळू त्याचं मोबाईल वापराचे तास कमी. निश्चित हळूहळू मुले मोबाईल फोनपासून लांब होतील आणि खेळ आणि अभ्यास यामध्ये रमतील.