Parenting Tips : लहान मुलांचा खोडकरपणा हा बरेचदा घरातील वातावरणात आनंद निर्माण करणारा ठरतो. परंतु, त्याचा अतिरेक झाला आणि त्रास होऊ लागला म्हणजे तो नकोसा होतो. मुलांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी किंवा अयोग्य कृती वेळीच रोखणे आवश्यक असते. कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही वेळी तीव्र क्रोध व्यक्त करणे, आपले म्हणणे न ऐकणे, एकाच गोष्टीवर अडून त्याचाच हट्ट धरणे या गोष्टी सातत्याने घडू लागल्या तर त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असते. मुलांच्या अशा सवयींवर पालकांनी कोणता इलाज करायचा आणि आपले वागणे कसे ठाम ठेवायचे याबाबत जाणून घेऊ.
प्रत्येकवेळी नसले तरी बरेचदा मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे अत्यंत गरजेचे असते. काही मुले त्यांना तीन-चार वेळा एखादी गोष्ट सांगितली तरीही ती न ऐकल्यासारखी करतात. छोटेसे काम सांगितले तरीही त्यांना ते करायचे नसते. काम करणे तर दूरच; पण त्याबाबत काही प्रतिक्रिया किंवा उत्तरही देत नाहीत. अशा मुलांच्या बाबतीत पालकांनी काही गोष्टी अवश्य कराव्यात, असे तज्ज्ञ सांगतात. पालकांनीदेखील या मुलांना त्यांच्याच भाषेत आपले म्हणणे सांगावे. म्हणजे मूल आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर पुढच्या वेळेस तो जेव्हा तुमच्याशी बोलत असेल तेव्हा तुम्हीदेखील त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करावे. असे जाणीवपूर्वक केल्यानंतर आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर काय होते हे मुलाला समजेल. परिणामी, पुढच्या वेळेस तो आपोआपच तुमच्या म्हणण्याला महत्त्व देईल.
काही मुलांना मोठी माणसे बोलत असताना मध्येच स्वतःचे काही तरी सांगण्याची सवय असते. याचे कारण म्हणजे बरेचदा आई-वडील मुलांना 'दोन मोठी माणसे बोलत असताना मध्येच बोलू नये' हे सांगतच नाहीत. यासाठी सर्वप्रथम मुलाला शांतपणे आपल्याजवळ बसवून समजवावे. तरीही त्याने ऐकले नाही तर 'तू जर यापुढे माझे ऐकले नाहीस तर मी तुला खेळायला जाऊ देणार नाही' असे ठामपणे सांगावे.
काही मुलांना खेळताना सोबतच्या मित्रांना मारण्याची सवय असते. अशा मुलांच्या पालकांकडे नेहमीच शेजार्यांच्या तक्रारी येत असतात. अशा वेळी पालकांनी थोडे सावध व्हावे. आपला मुलगा जास्त रागीट होत नाहीये ना, जास्त आक्रमक होत नाहीये ना, याकडे लक्ष द्यावे. आपल्याला आपला हक्क अथवा हवी ती गोष्ट समोरच्याला मारून सहजपणे मिळवता येते असा तर तो विचार करू लागलेला नाही ना, याची खात्री करून घ्यावी. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुले नैसर्गिकरीत्या आई-वडिलांचे अनुकरण करण्यासाठी मुळातच प्रोग्रॅम्ड असतात. त्यामुळे घरात कौटुंबिक हिंसा होत नाही ना किंवा मूल दुसर्या कुठल्याही व्यक्तीला मारताना बघत नाहीये ना, याची खात्री करून घ्यावी आणि त्यानुसार परिस्थितीमध्ये बदल घडवून आणावा.
काही मुलांना स्वतःच्या घरात किंवा दुसर्यांकडे गेल्यानंतर कुठलीही वस्तू न विचारता उचलून घेण्याची सवय असते. ती वस्तू कदाचित चॉकलेटइतकी छोटीही असू शकते; परंतु त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. कारण हीच सवय कायम राहू शकते. मुलांना असे का करू नये, न विचारता दुसर्याची वस्तू घेणे कसे चुकीचे आहे हे समजावून सांगावे.
मुलांना वेळेबाबत शिस्त लावण्यासाठी पालकांनी स्वतः तसे आचरण करणे गरजेचे असते. घराबाहेर पडताना आपण किती वेळात येणार आहोत हे मुलांना सांगणे आणि त्याच वेळेत परत येणे आवश्यक आहे.
इगो, अहंकार, दुराभिमान हे शब्द मोठ्या माणसांशी जोडलेले असतातच; परंतु अलीकडच्या काळात मुलांमध्येही इगोे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. काही वेळा मनासारखे काम करू दिले नाही किंवा मित्रांसमोर रागावले तर मुले विचित्र प्रतिक्रिया देतात. अशा वेळी आई-वडिलांनी मुलांना सांगावे की, तू असे वागलास तर त्याची शिक्षा तुला मिळेल. कदाचित आई-वडील तुझ्याशी बोलणारही नाहीत. असे सांगितल्यामुळे मुलांमधील इगो वेळीच थोपवता येईल.
आई-वडिलांना बघूनच मुले शिकत असतात. मुलांची प्रत्येक कृती मग ती योग्य असो वा अयोग्य; त्यासाठी आई-वडिलांनाच जबाबदार मानले जाते. बर्याच मोठ्या प्रमाणात मुलांवर आई-वडिलांच्या वागण्याचा परिणाम होत असतो. म्हणजे आई-वडील जास्त भांडखोर असतील तर मुलेदेखील त्याच प्रवृत्तीची बनू शकतात. म्हणूनच आपल्या वागणुकीचाच आरसा आपण मुलांना दाखवत आहोत हे पालकांनी जाणून घेतले पाहिजे.
– राधिका बिवलकर