Parenting Tips : तुमची मुलं चिडचिड करतात का? मग त्यांना असे करा शांत... | पुढारी

Parenting Tips : तुमची मुलं चिडचिड करतात का? मग त्यांना असे करा शांत...

पुढारी ऑनलाईन डेस्क :  लहान मुलं हट्टीपणा आणि चिडचिडेपणा करताना दिसतात. त्यामुळे पालक सतत वैतागलेले असतात. लहान मुलं कायमच कोणत्या ना कोणत्या अनोख्या गोष्टीचा हट्ट करतात आणि त्याचे पालक हट्ट पुरवत असतात. त्‍यांचा  हट्ट पूर्ण केला नाही तर मुलं अख्खं घर डोक्यावर घेतात. पालक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, लहान मुले चिडचिडे होताना दिसतात. मग त्यांच्यावर ओरडणे, मारणे यासारख्या अनेक गोष्टी पालकांकडून होतात. आपल्या पाल्याला समजून घेऊन त्यांना शांत कसे करावे यासाठी खास टिप्स जाणून घ्या… ( Parenting Tips )

लहान मुलांना जपणे, देखभाल करणे खूपच अवघड असते. कारण, लहान मुलांना प्रत्येक नवीन गोष्टीची उत्सुकता असते. त्यामुळे ते मोठ्याचे अनुकरण करत त्याच्यासारखे वागणे, बोलणे शिकत असतात. तर काहीवेळा सारखे- सारखे प्रश्न देखील विचारत असतात. यातून लहान मुलांचा हट्टीपणा जन्म घेतो. लहान मुलं सतत काहीतरी खायला मागणे, एकच खेळ सतत खेळणे, सतत टीव्ही पाहणे, एकाच घराच्या कोपऱ्यात जावून बसणे, स्वत:शीच बोलणे, पाय आपटणे, इतरांना चिमटे काढणे, मोबाईलचा हट्ट करणे, अभ्यास न करणे, पैसे मागणे, उलट बोलणे, गेम खेळणे यासारख्या अनेक गोष्टी करत असतात. या प्रकारामुळे घरात विशेषत: आई रागावलेली असते. या सगळ्यातून त्यांचा चिडचिडेपणा निर्माण होतो आणि पालकांना याचा त्रास होतो.

मुलांना वेळ द्या

काही ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धती असल्याने मुलांना पालक वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे लहान मुले चिडचिडी होतात.  काही ठिकाणी तर पालक नोकरीवर असल्याने मुलांकडे दुर्लक्ष होत असते. लहान मुले चिडचिडेपणा करत असल्यास पहिल्यांदा पालकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे. मुलांचे म्हणणे काय आहे ते जाणून घ्यावे. त्याच्यासोबत संवाद साधत राहिल्यास त्यांचा चिडचिडेपणा कमी होईल. लहान मुलांचे मन गुंतवून ठेवण्यास मदत होते.

मुलांना फिरायला घेऊन जावे

लहान मुलं सतत घरात राहून चिडचिडे होतात. पालकांनी मिळेल त्यावेळी आणि कधी-कधी कामातून सवड काढून मुलांना फिरायला घेऊन जावे. यामुळे देखील मुलांचा चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते. फिरायला लहान मुलांना आवडत असल्याने त्यांना फिरायला घेऊन जाते. त्यांचे मन देखील रमायला मदत होते.

मुलाशी संवाद साधा

लहान मुले नेहमीच मोठ्यांचे अनुकरण करतात त्यामुळे त्याच्याशी संवाद साधावा. त्याचे म्हणणे नीट एकूण घ्यावे. जमल्यास त्यांच्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत. मात्र, त्याच्यावर कोणत्याही पद्धतीची जबरदस्ती करू नये.

मुले चांगले वागल्यानंतर त्यांचे कौतुक करावे

मुलांनी केलेल्या कामाचे कौतुक करा. त्यांना शाबासकी द्या. जमल्यास त्यांना बक्षीसही द्यावे. त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळाल्याची त्य़ांना जाणीव होते.

मुलांना मारू नका

लहान मुलांना छोट्या- छोट्या गोष्टींसाठी मारू किंवा रागवू नये. कारण असे केल्यास त्यांच्यामध्ये अजून हट्टीपणा निर्माण होतो आणि पुन्हा – पुन्हा ते तसेच वागण्याचा प्रयत्न करतात. मारण्यापेक्षा पालकांना त्यांना समजूत घालून इतरत्र त्याचे मन ओळवण्याचा प्रयत्न कारावा. असे केल्यास मुलांचा चिडचिडपणा कमी होतो.

मुलांना प्रायव्हसी द्या

लहान मुलांना सतत हे कर आणि ते करू नकोस असे बिंबवू नका. कारण लहान मुलांमध्ये कायमच बंधनात ठेवले जाते अशी भावना निर्माण होते. आणि त्यामुळे त्याच्या बालमनावर विपरित परिणाम होतो. लहान मुलांना मोकळे राहू द्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे ओझे वा जबरदस्ती करू नका. त्यांच्याशी प्रेमाने वागा. ते चुका करणार नाहीत, याकडे प्रामुख्याने लक्ष ठेवा. मुलांना मोकळीकता दिली की, ते उत्साहात आणि आनंदात राहत असतात.

मुलांना आवडीचे पदार्थ द्या

लहान मुलांना त्याच्या आवडीचे पदार्थ खायला दिल्याने त्याचा चिडचिडेपणा कमी होतो. या सर्व गोष्टीमुळे लहान मुलांचा चिडचिडपणा कमी होण्यास मदत होते. ( Parenting Tips )

हेही वाचा : 

Back to top button