औरंगाबाद : मराठा आरक्षण कोट्यामधील रखडलेल्या नियुक्त्या देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : विनोद पाटील

औरंगाबाद : मराठा आरक्षण कोट्यामधील रखडलेल्या नियुक्त्या देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : विनोद पाटील

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : २०१४ ते २०२० या कालावधीत मराठा आरक्षण कोट्यातून नियुक्त्यी होऊनही कामावर रुजू होवू शकले नाहीत, अशा उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत सरकार सकारात्मक असून निवड यादीतील शेवटच्या उमेदवारालाही नोकरीत घेण्यात येईल, असे आश्नासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी आज (दि.28) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विनाेद पाटील म्हणाले की, अनेक तरुणांच्या बलिदानानंतर मराठा आरक्षण मिळाले होते; परंतू ते आरक्षण न्यायालयामध्ये टिकले नाही. चार हजारांपेक्षा जास्त तरुण शासकीय नोकरीच्या नियुक्तीपासून वंचित असून, राज्य शासनाकडे मात्र 1100 जणांचीच यादी सादर झाली आहे. अधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती पाठविली नाही. कोषागार, आरटीओ विभागासह अनेक विभागांनी आकडेवारी दिलेली नाही. आमचा रोष हा त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व विभागप्रमुखांवर आहे. शांततेच्या मार्गाने मराठा क्रांती मोर्चा काम करत आहे. आमचा अंत बघू नका, असा इशारा विनोद पाटील यांनी या वेळी दिला. अंतिम यादीत नाव आलेल्या उमेदवारांनी त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

माजी खासदार संभाजीराजेंनी काय भूमिका घ्यायची, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते राज्यसभा सदस्य होते, ते राजकारणी आहेत. सुरवातीला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लाेकसभा लढविली होती. नंतर ते राज्यसभेचे सदस्य झाले. मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर येऊन त्यांनी मागणी केलेली नाही. राजकारणात एखाद्याचे कौतुक किंवा विरोध करायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. मराठा क्रांती मोर्चा म्हणून कुणाचेही कौतुक किंवा विरोध करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कारण मराठा क्रांती मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मराठा क्रांती मोर्चाला कुणाचेच नेतृत्व नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा हेच आमचे सर्व काही आहे.

संभाजीराजेंनी त्यांनी संघटना काढली आहे, त्यांची भूमिका ते स्वराज्य संघटना म्हणून मांडत असतील. मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली आम्ही कधीच कुणाच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका मांडलेली नाही. वैयक्तिक विषय बाजूला ठेवून सर्वांनी प्रयत्न करावे. समाजासाठी फारसे योगदान नसलेले मराठा समाजाच्या नावावर लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news