जनाई-शिरसाई, पुरंदर उपसा योजना पूर्ण क्षमतेने सुरू करणार; फडणवीस यांचे आ. कुल यांना आश्वासन | पुढारी

जनाई-शिरसाई, पुरंदर उपसा योजना पूर्ण क्षमतेने सुरू करणार; फडणवीस यांचे आ. कुल यांना आश्वासन

दौंड; पुढारी वृत्तसेवा: जनाई-शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. या संबंधी आ. कुल म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील दौंड, पुरंदर आणि बारामती या तिन्ही तालुक्याच्या दृष्टीने जनाई शिरसाई आणि पुरंदर या योजना जिरायत भागासाठी वरदान ठरलेल्या असून त्या गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत.

या प्रश्नावर आ. कुल यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न विचारले होते, त्यावर पाण्याची उपलब्धता तपासून घेऊन, सर्व योजनांचे फेरसर्वेक्षण करण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच याबाबत कार्यवाही केली जाईल असे आ. कुल यांनी सांगितले आहे.

दौंड तालुक्यातील ताम्हणवाडी, बोरीऐंदी, बोरीभडक, डाळिंब, भांडगाव, खोर, पडवी, देऊळगाव गाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव व पांढरेवाडी अशी अनेक गावे ही दुष्काळी परिस्थितीचा सामाना करीत आहेत. दौंड तालुक्याच्या उशाशी जनाई- शिरसाई व पुरंदर जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. मात्र, या पाण्याचा दौंडकर जनतेला आजपर्यंत निश्चित स्वरूपात फायदा झाला नाही. दौंड तालुक्यातील या गावांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार कुल यांनी केली आहे.

 

Back to top button