मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : ‘सारथी’च्या योजना कागदावर नकोत तर कृतीत साकारायला हव्या  

सारथी www.pudhari.news
सारथी www.pudhari.news
Published on
Updated on
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
'सारथी'च्या उपक्रमांसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार आहेत, तुम्ही अडचणी, समस्या सांगा, त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, सारथी ही केवळ एक वास्तू म्हणून नकोत, तिचा उद्देश पूर्ण व्हायला हवा , सारथीच्या योजना केवळ कागदावर नकोत, तर त्या कृतीत पूर्णपणे उतरायला हव्यात असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था 'सारथी' पुणे च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन शुक्रवारी (दि. २१) झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र किशोर दराडे, दिलीप बनकर, ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी खासदार युवराज संभाजीराजे भोसले, सारथीचे अध्यक्ष मधुकर कोकाटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, उपवियवस्थापकीय संचालक नितीन गावंडे तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचार, प्रेरणेतून सर्वसामान्य लोकांच्या मनातले कल्याणकारी शासन म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत, त्यादृष्टिनेच काम करत आहोत. मराठा समाजातील तरूणाईला कौशल्य विकासाचे धडे देण्याबरोबरच त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि अर्थिक विकास होण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम 'सारथी'च्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. नाशिक येथे उभारण्यात आलेले 'सारथी' चे हे कार्यालय केवळ एक शासकीय वास्तू नसून ते अनेक तरूणांच्या भविष्याचे शिल्पकार असलेली प्रेरणा आहे. छत्रपती शाहू महाराजांचा राजमुकुट हे 'सारथी'चे बोधचिन्ह असून ते दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढायची प्रेरणा देणारे चिन्ह आहे.
नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून 'सारथी'चा दृष्टिकोन केवळ कागदावरच न ठेवता तो कृतीत साकारण्याची संधी मिळाली आहे. विविध स्पर्धा परीक्षा, निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तरुण व विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने सर्वांना लाभली आहे, त्यासाठी शासन 'सारथी'च्या सर्व आवश्यकतांची प्रतीपूर्ती करणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
व्यापक जनहितासाठी काम करत असताना प्रसंगी कुठलेही धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली तरी ते घेण्याची तयारी असल्याचे सांगून जे मराठा समाजातील तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवूनही नियुक्तीपासून वंचित होते, त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते शासन करत राहील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
तसेच नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना गरजू लोकांना शासनामार्फत दिली जाणारी शिधाभेट साखर, रवा, तेल व चनाडाळ ही वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही प्रशासनास त्यांनी दिल्या. सततच्या पावसाने शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जातो आहे. त्यासाठी व्यापक स्वरूपाचे परिणामकारक निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीची मदत शेतकरी बांधवांना देण्याबरोबरच निकषात न बसणाऱ्या व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी भरपाई दिली जाणार असल्याचे सांगितले. सारथीचे अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी प्रास्ताविक केले.
'सारथी'च्या मध्यमातून तरूणांना दिशा….
'सारथी'च्या माध्यमातून मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या तरुणांना दिशा मिळते आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे 'सारथी'मुळे विविध स्पर्धा परिक्षांमधून ५० विद्यार्थ्यांची देशाच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी पदांवर निवड झाली आहे. 'सारथी'च्या जडण-घडणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान व पाठबळ असून त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानताना 'सारथी'च्या योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news