काळजी घ्या… बदलते वातावरण, दम्याला निमंत्रण! | पुढारी

काळजी घ्या... बदलते वातावरण, दम्याला निमंत्रण!

  • डॉ. अनिल मडके

बदलते वातावरण, ढगाळ हवामान, हवेतील पराग कण, थंड, बोचरी हवा या विविध कारणांमुळे तसेच आपल्याभोवती असणारा धूर, जसे की रस्त्यावरील वाहनांचा धूर, कारखान्याचा धूर, चुलीचा धूर, उदबत्ती, डास पळवणार्‍या कॉईल्स किंवा मॅट यांचा धूर याशिवाय कोणत्याही प्रकारचा उग्र वास; जसे की परफ्यूम, डिओडोरंट, अत्तर, रूम फ्रेशनर एवढेच नव्हे तर रंग, कीटकनाशके, काही खाद्यपदार्थ, विशिष्ट प्रकारची औषधे या सर्वांमुळे दम्यासारखे श्वसनविकार बळावतात.

‘येत्या काही दिवसांत अधूनमधून तुरळक ऊन पडण्याची शक्यता आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.’ अशा प्रकारचे विनोदी मेसेज आता व्हॉट्सअ‍ॅपवरील युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडत आहेत. याचं कारणही तसं आहे. ऐन ऑक्टोबरमध्ये जून-जुलैचा फील आहे. बाहेर सतत पाऊस आहे. वातावरण स्थिर नाही. सकाळी उकाडा, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पाऊस- असे बाहेर चित्र आहे.

हे वास्तव सविस्तरपणे आपल्यासमोर मांडण्याचे कारण म्हणजे, आपण सारेजण जरी या वातावरणात दीपावली साजरी करण्याच्या तयारीत असलो तरी, आपल्यापैकी अनेकजण अशा वातावरणामुळे धास्तावून गेले आहेत. हे अनेकजण म्हणजे ज्यांना आधीपासून दमा, सीओपीडी, अ‍ॅलर्जी, सर्दी, सायनस विकार, आय. एल. डी. असे श्वसनविकार आहेत किंवा ज्यांच्या घरी अशा प्रकारचा एखादा रुग्ण आहे आणि त्यांना या वातावरणाचा त्रास होण्याची भीती किंवा शक्यता आहे.

भारतात जवळपास प्रत्येक दहा व्यक्तींमागे एका व्यक्तीत आढळणारा दमा हा श्वासनलिकांचा एक महत्त्वाचा विकार आहे. काही कालावधीसाठी आपल्या फुफ्फुसातील श्वासनलिका अरुंद होऊन, श्वास आत घेण्यास आणि बाहेर सोडण्यास त्रास करणारा विकार म्हणजे ‘दमा’. या विकारात, श्वासनलिका अरुंद झाल्यामुळे छातीतून सुंई सुंई असा आवाज येतो. पुरेसा प्राणवायू हवेतून घेता येत नाही. त्यामुळे दम लागतो, धाप लागते. अनेक रुग्णांना खोकला येतो.

आता तर ऐन दीपावलीत पावसाळा आहे आणि येत्या काही दिवसांत फटाक्यांची आतषबाजी सुरू होईल. पण या दोन्ही बाबी म्हणजे, अशा प्रकारचे हवामान आणि त्यात फटाक्याचा धूर या दोन्ही गोष्टींमुळे अशा प्रकारच्या रुग्णांना अधिक त्रास होण्याची शक्यता असते.
अशा वातावरणात हवेतील विषाणूंचे, जिवाणूंचे, विविध प्रकारच्या बुरशींचे प्रमाणदेखील वाढते.

ज्या रुग्णांना आधीपासूनच श्वसनविकार आहे किंवा ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी झालेली आहे – जसे की मधुमेही रुग्ण, कॅन्सरग्रस्त रुग्ण, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार किंवा रक्तविकार असलेले रुग्ण, एचआयव्ही बाधित रुग्ण आणि आजच्या जमान्यात बोलायचे झाले तर ज्यांना मध्यम-तीव्र प्रकारचा कोव्हिड होऊन गेलेला आहे असे रुग्ण.

हे वातावरणातील या वाढलेल्या जंतूंच्या संसर्गाला बळी पडतात. अशा रुग्णांचा खोकला वाढतो. खोकल्यातून कफ बाहेर पडतो. सुरुवातीला तो थुंकीसारखा पातळ असतो. नंतर तो पिवळसर होतो. कांही रुग्णांमध्ये हिरवट कफ पडतो. काही रुग्णांना बारीक ताप येतो, कणकण येते. त्यामुळे या वातावरणात सर्वांनी दक्ष राहणे महत्त्वाचे ठरते.

ज्यांना आधीपासूनच श्वसनविकाराची औषधे सुरू आहेत, त्यांनी त्यामध्ये खंड पडू देऊ नये. आहारावर नियंत्रण ठेवावे. दीपावलीतील फराळ करायला हरकत नाही, पण शक्यतो तो घरीच तयार करावा. बाजारातून आणलेला फराळ उत्तम दर्जाचा आहे की नाही पाहणे महत्त्वाचे. कारण त्यात वापरलेले तेल आणि त्याचा दर्जा तुमच्या शारीरिक त्रासास कारणीभूत ठरतो.

सर्दी, नाक गळणे, शिंका, नाक बंद होणे तसेच खोकला, कफ, दम लागणे, छाती घरघरणे अशा कोणत्याही तक्रारींसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’तून प्रसारित होत असलेल्या विविध प्रकारच्या काढ्यांचा वापर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिलकुल करू नये. असा काढा वापरून मूत्रपिंडावर परिणाम झालेले अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे कृपया अशा निनावी सल्ल्यांवर विसंबून आपले आरोग्य पणाला लावू नये.

आज दम्यासारख्या विविध श्वसनविकारांवर उत्तम दर्जाची औषधे उपलब्ध आहेत. ती तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या कालावधीसाठीच घ्यावीत. सेल्फ मेडिकेशन हे नेहमीच धोक्याचे असते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट, दमा हा तशा अर्थाने आजार नाही किंवा विकार नाही ती एक अवस्था आहे. वेळीच आणि योग्य उपचाराने या अवस्थेवर मात करता येते. योग्य ते पथ्यपाणी केल्यास ही अवस्था पुन्हा उद्भवत नाही. ‘मानसिक ताणतणाव’ हेही या अवस्थेत कारणीभूत असते, हे लक्षात ठेवून नेहमी आनंदी – समाधानी राहावे. म्हणजे ऐन दिवाळीत आपला श्वास उत्तम राहील आणि प्रकृती ठणठणीत राहील.

Back to top button