ताजमहालातील बंद खोल्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; खोल्या उघडण्याची मागणी फेटाळली | पुढारी

ताजमहालातील बंद खोल्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; खोल्या उघडण्याची मागणी फेटाळली

पुढारी ऑनलाईन : ताजमहालातील बंद असलेल्या २० खोल्यांचे दरवाजे खुले करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. यावेळी न्यायालयाने ही याचिका केवळ प्रसिद्धीच्या उद्देशाने दाखल केली असल्याचे म्हणत ती फेटाळून लावली. याचिका फेटाळताना न्यायालय कोणतीही चूक करत नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती एमआर शहा आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालातील बंद असलेल्या २० खोल्या खुल्या करून तेथे हिंदू मूर्ती वा शिलालेख आहेत किंवा कसे, त्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका भाजपच्या अयोध्या शाखेचे प्रसिद्धीप्रमुख डॉ. रजनीश सिंह यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. सत्य काय ते समोर यावे म्हणून सरकारला समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. ताजमहाल परिसराचे सर्वेक्षण आवश्यक आहे. यातूनच वास्तव काय ते समोर येईल. याचिकेत काही इतिहासतज्ज्ञांचे संदर्भ दिले आहेत. पी. एन. ओक तसेच अन्य इतिहास तज्ज्ञांच्या मते, चार मजली ताजमहालातील बंद असलेल्या खोल्यांत शिव मंदिर आहे, असाही दावा करण्‍यात आला हाेता.

याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने म्हटले होते की, ताजमहालची निर्मिती शाहजहाननेच केली, याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. त्यामुळे ताजमहालच्या तळघराच्या खोल्या उघडून सत्य आणि वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याने, ताजमहालमधील खोल्या उघडण्याची मागणी केली होती. या मागणीबाबत डॉ. रजनीश सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका केवळ प्रसिद्धीच्या उद्देशाने दाखल केली असल्याचे सांगत ती फेटाळून लावली.

हेही वाचा:

Back to top button