छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या; महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तिघे आरोपी माफीचे साक्षीदार

छगन भुजबळ
छगन भुजबळ

मुंबई: पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. या खटल्यातील तिघा आरोपींना माफीचा साक्षीदार बनण्यास ईडीने तयारी दर्शविली आहे. याची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधिश राहुल रोकडे यांनी त्या तिघा आरोपींच्या अर्जावर सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे.

महाराष्ट्र सदन बांधकामातील 850 कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने 2016 मध्ये छगन भुजबळ, पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्याच्या खटल्याची सुनावणी सध्या आमदार-खासदारांच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. मागील सुनावणीवेळी काही आरोपींतर्फे त्यांच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर युक्तिवादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सुनील नाईक, सुधीर सालस्कर, अमित बलराज या तीन आरोपींनी विरोध करत न्यायालयाने इतर आरोपींच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर सुनावणी घेण्याआधी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, असा युक्तिवाद केला. अ‍ॅड. मर्चंट यांनी संबंधित तीन आरोपींच्या माफीचा साक्षीदार बनण्याच्या अर्जांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले होते. या अर्जाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तिघांच्या अर्जांवर ईडीला आपले उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार ईडीच्यावतीने अ‍ॅड. सुनील घोन्साल्वीस यांनी लेखी उत्तर सादर केले आणि तिन्ही आरोपींना माफीचा साक्षीदार बनवण्यास तपास यंत्रणेची सहमती असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. ईडी अर्जावर सुनावणी घेण्यास संमती दिल्याने भुजबळ कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news