कराची /मुंबई : वृत्तसंस्था : १८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता भारताचा मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विषप्रयोग झाल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने बातम्या सुरू झाल्या. नंतर दाऊदच्या मृत्यूची व त्यानंतर पाकिस्तानात इंटरनेट, सोशल मीडिया बंदची बातमी आली. पाकिस्तान सरकार अधिकृतपणे याबाबत काही बोलणारच नाही; पण दाऊदचा हस्तक कुख्यात गुंड छोटा शकील याने दाऊद ठणठणीत असल्याचे भारतातील एका वृत्तवाहिनीला सांगितले. मी स्वतः दाऊदच्या सतत संपर्कात असल्याचेही तो म्हणाला. भारतातील विशेषतः मुंबईतील तपास यंत्रणांनीही दाऊदच्या मृत्यूच्या बातमीचा मागोवा घेतला, पण दाऊद जिवंतच आहे, अशी माहिती या यंत्रणांतील सूत्रांना मिळाली. याआधीही दाऊदबाबत २०१६, २०१७ आणि २०२० अशा तीनदा अफवा पसरल्या होत्या.
आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेवर दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) सुरक्षेची जबाबदारी आहे. याउपर दाऊद या सगळ्यांवरही पूर्णपणे विसंबून नाही किंवा त्याचा यांच्यावर पूर्ण विश्वास नाही. कराचीतील क्लिफ्टन भागात दाऊदच्या घराच्या परिसरात ड्रोन उडवण्यास मनाई आहे. दाऊदच्या घराच्या ४ कि.मी. परिसरात कोणीही आपले वाहन थांबवू शकत नाही. दाऊदभोवतीच्या सुरक्षा वर्तुळाची ५ स्तर आहेत. सुरुवातीला होमगार्ड, दोन नंबर पोलिस, नंतर पोलिस दलातील कमांडो, नंतर लष्करी कमांडो, त्यानंतर त्याच्या भोवतीचे पहिले वर्तुळ त्याच्या २५ वर वैयक्तिक सुरक्षा रक्षकांचे असते.