चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधिमंडळात गंभीर चिंता व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर विधीमंडळात मुद्दा व्यक्त करून महिलांवरील अत्याचार रोखण्याची मागणी केली.
चंद्रपूर सारख्या छोट्या जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या कार्यकाळात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात 3500 अधिक 16 ते 25 वयोगटातील तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती मांडली. शासन या बेपत्ता महिलांचा शोध घेणार का?" असा सवाल करीत आमदार धानोरकर यांनी महिलांवरील अत्याचारांवर कठोर कायदा करण्याची मागणी केली. महिलांची "फेसबुक व्हाट्सअप सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फसवणूक होत आहे. एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा प्रकरणातून महिलांच्या असहायतेचा फायदा घेतला जातो आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत वाढ होत आहे.
"अलीकडे महाराष्ट्रात महिलांवर घडलेल्या काही घटनांमुळे महाराष्ट्र नक्कीच हादरलेला आहे. मुंबईतील वसतिगृहात विद्यार्थिनीची झालेली हत्या असो किंवा सरस्वती वैद्य या महिलेची केलेली क्रूरपणे हत्या असो त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था जिवंत आहे का ? असा प्रश्न त्यांनी केला. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लवकरच शक्ति कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी केली. "हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक प्रकारे सुरक्षा कवच महिलांना मिळेल." चंद्रपूर येथील कोळसा उद्योगातून एका निष्पाप महिलेची हत्या राजुरा येथे घडल्याचे सांगून अशी प्रकरणे तात्काळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली.