नाशिक : पुढारी वृत्तसेवा
१९९१ साली शिवसेनेमधून काॅंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी ज्या ३६ आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या त्या यादीत शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांची सही सर्वांत वर होती. तेव्हा घोलप यांची निष्ठा कुठे होती? अशा शब्दांत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी घोलपांवर घणाघात केला. दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व लाभार्थींना आनंदाच्या शिध्याचे वाटप पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Chhagan Bhujbal)
संबधित बातम्या :
सेनेचे उपनेते घोलप यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांच्यावर टीका करताना वर्षभरापूर्वी त्यांचा सेना प्रवेश रोखल्याचा गौप्यस्फोट केला. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.१८) बैठकीच्या निमित्ताने आलेल्या भुजबळ यांना याबाबत विचारले असता आपण किंवा माझ्या घरच्यांनी शिवसेना प्रवेशावर कधी वक्तव्य केले नसल्याचा दावा केला. तसेच ही कार्यकर्त्यांमधील चर्चा असू शकते. आमच्या निष्ठेवर टीका करणाऱ्या घोलप यांनी १९९१ साली काॅंग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी केली होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, अशा शब्दांत भुजबळ यांनी घोलपांचा समाचार घेतला. (Chhagan Bhujbal)
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेच्या सभागृहात ओबीसींच्या आरक्षात १० टक्के वाढ करत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. याबाबत भुजबळांना विचारले असता ही चांगली गोष्ट आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो कायदा केला त्यात १२ ते १३ टक्के तरतूद मान्य केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयात अडचण निर्माण झाली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची जुनी मागणी आहे. पण, हे आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असेही भुजबळ म्हणाले.
चर्चेतून मार्ग काढू
मराठा समाजाला आरक्षण देणे ही सर्वपक्षीयांची भूमिका आहे. आत्महत्या, दगडफेक व आंदोलने करून हा प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी चर्चेतून मार्ग निघू शकतो. सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने मराठा समाजाने आंदोलने थांबवावी, अशी विनंती छगन भुजबळ यांनी केली.
हेही वाचा :