ट्रान्सफॉर्मर जळाला ? या नंबरवरुन थेट महावितरणला कळवा

ट्रान्सफॉर्मर जळाला ? या नंबरवरुन थेट महावितरणला कळवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्याजागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. परंतु ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला, तर विद्युत पुरवठा खंडित होऊन गावकर्‍यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे, असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर दररोज घेण्यात येतो.

या मोहिमेला यश आले असून, महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्सफॉर्मर जळाला आहे, हेच उशिराने समजले तर प्रत्यक्षात वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणला मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच वीजग्राहकांना पुणे परिमंडल अंतर्गत पुणे ग्रामीण मंडल- 7875767021, रास्ता पेठ मंडल- 7875767015 आणि गणेशखिंड मंडलासाठी 7875767010 या मोबाइल क्रमांकावर संबंधित कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना माहिती देता येईल. त्यासोबत पुणे ग्रामीण मंडल- 7875767021, रास्ता पेठ मंडल- 7875767015 आणि गणेशखिंड मंडलासाठी 7875767010 या व्हॉट्स प क्रमांकावर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटो व ठिकाणाचा तपशील कळविता येईल.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news