Pune : पाटस-कुसेगाव रस्ता अपघातप्रवण | पुढारी

Pune : पाटस-कुसेगाव रस्ता अपघातप्रवण

कुसेगाव : पुढारी वृत्तसेवा :  पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याने पाटस-कुसेगाव अष्टविनायक महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. यात ऊस वाहतूक वेगाने होत असल्याने अनेकदा ट्रॅक्टर पलटी होत आहेत. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना सावध वाहने चालवा, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. पाटस कारखाना चौक ते भीमा पाटस कारखाना यादरम्यान असणार्‍या कालव्यावरील पुलावर ऊस ट्रॅक्टर व चारचाकी गाडी व्यवस्थित बसत नाही, तर कालवा पुलावर अवघड चढ असल्याने ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरना मोठी कसरत करून प्रवास करावा लागत आहे.

या अष्टविनायक महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. यात दुचाकीचालकांना मोठी कसरत करून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे कारखाना ते कारखाना चौकादरम्यान प्रवास करताना ट्रॅक्टर वगळता अन्य चालक व दुचाकीस्वारांनी सावधपणे प्रवास करावा, अशा सूचना नागरिकांकडून मिळू लागल्या आहेत.

मंगळवारी ऊस ट्रेलर पलटी
मंगळवारी (दि. 21) रात्री साडेदहाच्या सुमारास पाटस ते कारखाना अष्टविनायक महामार्गाच्या कालव्यावरील चढावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरचे एक चाक रस्त्याच्या साईडपट्ट्यांमध्ये गेल्याने ऊस ट्रेलर पलटी झाला होता. परिणामी मोठा गोंधळ उडून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. असे असताना काही वाहनचालक वेगाने प्रवास करता असताना दुचाकीस्वारांना मात्र कसरत करून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला.

Back to top button