Pune : व्हिक्टोरिया तलावात केवळ 18 टक्के पाणी | पुढारी

Pune : व्हिक्टोरिया तलावात केवळ 18 टक्के पाणी

 खोर : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या वरवंड (ता. दौंड) येथील व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या धरणात सध्या केवळ 18 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, खडकवासला धरणसाखळीतून आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यावर्षी दौंड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. याचा मोठा फटका शेतकरीवर्गाला बसला. पाण्याच्या अभावामुळे सध्याच्या स्थितीत खडकवासला कालवेदेखील बंद झाले आहेत. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामाला उन्हाळी आवर्तन सोडण्याची सध्या मागणी होत असून, उन्हाळी पिके जगविण्याची सध्या शेतकरी वर्गाची धडपड सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या :

वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून दौंडच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण भागाच्या अनेक गावाच्या जलजीवन योजना या वरवंड येथील तलावावर अवलंबून आहेत; मात्र या तलावात केवळ 18 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील हंगाम पाण्याच्या कमतरेमुळे धोक्यात आला आहे. खडकवासला धरणसाखळीतून जर वेळेत पाणी सुटले, तर शेतकरी वर्गाची पाण्याची समस्या वेळेत सुटली जाऊन उन्हाळी पिकांना याचा मोठा आधार मिळणार आहे. खडकवासला धरणसाखळीतून वेळीच आवर्तन सुटले गेले, तर खडकवासला कालव्याला देखील पाणी राहील आणी शेतकरी वर्गाचा पुढील हंगामदेखील सुरळीत पार पडेल, अशी माफक अपेक्षा या भागातील शेतकरी वर्गाची आहे.

 

Back to top button