पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड किंग शाहरुख खान (Boycott Pathan) ने त्याचा ५७ वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. यानिमित्ताने किंग खानचा पठान चित्रपटाचा टीजर लॉन्च झाला. पण, त्याआधीच बायकॉट पठान हा चित्रपट ट्विटरवर ट्रेंड करू लागला. शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या सुपरस्टारला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सूक आहेत. मात्र 'पठान' चित्रपटाचा टीझर रिलीज होण्यापूर्वीच शाहरुख खानचा चित्रपट बॉयकॉट गँगच्या निशाण्यावर आला. ट्विटरवर शाहरुखच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे. (Boycott Pathan)
ट्विटरवर शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटावर बहिष्कार सुरू झाला असतानाच लोक सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरही ट्विटद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "आमचा देश गुन्हेगारांना सोडेल, पण आम्ही सोडणार नाही. आम्ही आमचा आवाज उठवू आणि न्यायासाठी गर्जना करू. यासाठी आम्ही 'पठान'वर पूर्ण बहिष्कार घालतो."
त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, "सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची उत्तरे मिळेपर्यंत आम्ही त्याचा कोणताही चित्रपट पाहणार नाही. आघाडीच्या निर्मात्यांनी त्याच्या हातून चित्रपट का हिसकावून घेतला आणि दुसरा नायक का निवडला याचे उत्तर आम्हाला हवे आहे."
आणखी एका युजरने लिहिले की, "शाहरुख खान 'पठान' नाव वापरून इस्लामिक राष्ट्रांच्या वांशिकतेचा गौरव करतो आणि त्याने आम्हा हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि आम्हाला हिंदू असल्याची फसवणूक केली आहे. पाक आणि अफगाणिस्तानमध्ये मी अजूनही हिंदूंचा छळ होत आहे."
शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेता जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेता सलमान खानही कॅमिओ करताना दिसणार आहे. 'पठान' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे, तर चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे.