नगर : ‘ती’ कोरी बिले व्यवहारातून बाद! | पुढारी

नगर : ‘ती’ कोरी बिले व्यवहारातून बाद!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात कोर्‍या बिलांवर अभियंत्यांच्या स्वाक्षर्‍या असल्याचे वृत्त दै. पुढारीतून प्रसिद्ध होताच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. नव्याने आलेले कार्यकारी अभियंता सोनवणे आणि सहायक लेखाधिकारी घानमोडे यांना सूचना देताना संबंधित बिल ताब्यात घ्यावे, याशिवाय अन्य अशी काही बिले असतील तर त्याचा शोध घ्या, अशा सक्त सूचना लांगोरे यांनी संबंधितांना केल्या आहेत.

झेडपीतील बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यांची स्वाक्षरी असलेले बिल माध्यमांच्या हाती लागले होेते. संबंधित प्रकार दै. पुढारीने सीईओ येरेकर व अतिरिक्त सीईओ लांगोरे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर काल सकाळी लांगोरे यांनी तातडीने बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतल्याचे समजले. या बैठकीत उत्तर बांधकाम विभागात नव्याने आलेले कार्यकारी अभियंता सोनवणे, तसेच सहायक लेखाधिकारी अशोक घानमोडे यांना संबंधित बिलाचा वापर व्यवहारात होऊ नये, तसेच याशिवाय अन्य काही अशाप्रकारे स्वाक्षर्‍या केलेली बिले असतील, तर त्याची तपासणी करावी, अशा सूचना देतानाच याप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, असाही इशाराही लांगोरे यांनी दिल्याचे समजले.

तसेच बांधकाम विभागातील पारंपरिक ‘सिस्टम’बाबतही लांगोरे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, आतापर्यंत नियमात नसतानाही कनिष्ठ लिपिकांकडे असलेली ‘ती’ जबाबदारी आता ‘त्या त्या’ वरिष्ठांकडे देण्याच्या हालचालीही प्रशासनाकडून सुरू झाल्याचे समजले. त्यामुळे प्रशासनामधूनही या भूमिकेचे खासगीत स्वागत केले जात आहे.

Back to top button