ऑनलाइन व्यवहारांमुळे तारांबळ; सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप

ऑनलाइन व्यवहारांमुळे तारांबळ; सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना मनस्ताप
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारने आपल्या अखत्यारीत असलेल्या कॅन्टोमेंट बोर्डातील सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन (डिजिटल पेमेंट) केले असून, त्यासाठी ई-छावणी पोर्टल सुरू केले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी बोर्ड प्रशासन करीत आहे. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात डिस्चार्ज, एक्स-रे, सोनोग्राफी आदी तपासणीचे शुल्क ऑनलाइन भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे अजूनही सर्वसामान्य नागरिक ऑनलाइन आर्थिक व्यवहारासाठी साक्षर झालेले नाहीत. या रुग्णालयात येणारे नागरिक हे आर्थिक दुर्बल घटकातील असतात. प्रत्येक जण अँड्रॉइड किंवा स्मार्टफोन वापरतात, असे नाही. अनेकांकडे फोनच नसतो. असला तरी त्यांच्या बँक खात्यात पैसे असतातच असे नाही.

'माझ्या पोटात दुखत असल्याने डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला. मी सुरुवातीला केस पेपर काढण्यासाठी रोख रक्कम भरण्यासाठी गेले. त्या ठिकाणच्या कर्मचार्‍याने पैसे ऑनलाईन भरा, असे सांगून रोख रक्कम घेण्यास नकार दिला. माझ्याकडे साधा मोबाईल असल्याने ऑनलाइन पेमेंट करू शकत नव्हते. त्या वेळी मी माझ्या ओळखीच्या व्यक्तीला बोलावून पैसे ऑनलाईन भरले,' असे नजमा शेख यांनी सांगितले.

रुग्ण व नागरिकांच्या सर्व अडचणी, समस्या आम्ही जाणून आहोत. मात्र, ऑनलाइन पेमेंट करण्याची सक्ती ही केंद्र सरकारकडूनच करण्यात आली आहे. एखाद्या रुग्णाकडून ऑनलाइन पेमेंट होतच नसेल, तर आम्ही आमच्या कर्मचार्‍यांच्या खात्यावरून पैसे भरण्याकरिता मदत करत असतो
                                                                        – डॉ. उषा तपासे,
                                                                     रुग्णालय अधिष्ठाता

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news