पुढारी ऑनलाईन डेस्क : "'वीर सावरकर गौरवयात्रा' हे नाव असलं तरी ती अदानी बचाओ यात्रा आहे. गौतम अदानींच्या प्रकरणावरील महाराष्ट्राच लक्ष विचलीत व्हावं यासाठी सावरकरांच्या मुखवट्याखाली अदानी गौरव यात्रा काढत आहेत," अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेच्या वीर सावरकर गौरवयात्रेवर केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाविरोधात राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांत 'वीर सावरकर गौरवयात्रा' काढण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या यात्रेवरून आज खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, वीर सावरकर गौरव यात्रेसंदर्भात घोषणा करताना मुख्यमंत्री सावरकरांबद्दल दोन वाक्य उत्फूर्तपणे बोलू शकत नव्हते. एक कागद समोर होता तो वाचून दाखवत होते. ज्यांच्या ह्दयामध्ये सावरकर आहेत, त्यांनी सावरकरांना मानवंदना द्यायला पाहिजे होती. पण ते वाचू का हेही विचारतात, यालाच गुलामी म्हणतात. या गुलामी विरोधात सावरकरांनी अंदमानच्या तुरूंगात आयुष्य घालवलं, हे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी समजून घेतल पाहिजे. सावरकर गौरव यात्रा हे नाव असलं तरी ती अदानी बचाओ यात्रा आहे. गौतम अदानींच्या प्रकरणावरील लक्ष विचलीत व्हाव यासाठी ही यात्रा काढली जात आहे. सावरकर महान क्रांतीकारक होते, त्यांच्याबदल आदर आहे. त्यामुळे ढोंग्यांनी आम्हाला वीर सावरकर सांगण्याचा प्रयत्न करू नये. शिवाजी पार्कच्या बाजूला सावरकरांचे स्मारक उभारण्यात बाळासाहेबांचे योगदान आहे. सावरकरांचे हिंदूत्व आम्ही स्विकारले आहे. आमचं हिंदूत्व विज्ञानवादी आहे. आम्ही सावरकर जगलोय आणि जगतोय. भारतीय जनता पक्ष म्हणजे सावरकर नाहीत. त्यांनी यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
सोमवारी दिल्लीत आमची भूमिका स्पष्ट केली आहे. सावरकर आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांना धक्का लावता येणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होईल आणि दिल्लीत सुद्धा २०२४ ला बदल होईल. शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे त्यामुळे बदल होईल, अशी त्यांना भीती वाटते असेही राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :