कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : कसबा बावड्यातील काही सभासद कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला विरोध करतात, तर दुसरीकडे आमदार मात्र वेळेत सहवीज निर्मिती प्रकल्प आणि डिस्टिलरी का उभी केली नाही, असा प्रश्न करतात. निवडणुकीत आरोप करणारे सतेज पाटील वेळेनुसार भूमिका का बदलतात, असा सवाल माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक व कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते.
आमच्यावर टीका करणार्या पाटील यांनी डी. वाय. पाटील कारखान्याचे कार्यक्षेत्र किती, सभासद किती, मयत सभासदांच्या किती वारसांच्या नावे शेअर ट्रान्स्फर केले, सभासदांना साखर किती व काय दराने देता, याची उत्तरे द्यावीत. 'राजाराम'प्रमाणे डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याबाबत कोणत्याही चौकात येऊन चर्चा करण्याची तयारी असल्याचे आव्हान महाडिक यांनी दिले.
सतेज पाटील हे शिरोली आणि कसबा बावड्यात भांडणे लावण्याचे काम करत आहेत. त्यांनी राजाराम कारखान्याचे नेमके सभासद किती ही माहिती घ्यावी. अकराशेहून अधिक मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व दिल्याचे व एफआरपीप्रमाणे दर दिल्याचे ते म्हणाले.
सभासदांचं ठरलंय...
आमचं ठरलंय तसेच माझी ही शेवटची निवडणूक म्हणणारे आमदार सतेज पाटील तिसर्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. आता सभासदारांचे ठरलंय त्यामुळे ते आमच्या बाजूने असतील, असे अमल महाडिक म्हणाले, तर कंटाळलेले सभासद दाखवा, राजकारणातून संन्यास घेतो, असे आव्हान महादेवराव महाडिक यांनी दिले.