लोणी काळभोर : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, ही निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा समजली जात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीची ठोस भूमिका असल्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या निर्णायक भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पवारांचे हवेलीतील नेहमीचे 'जो निवडून येईल तो आमचा' हे धोरण त्यांनी राबविले, तर महाविकास आघाडीच्या तीन आमदारांना धोक्याच्या घंटेची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच भाजपला एक नवीन चेहरा गळाला लागणार असल्याची चर्चा हवेली तालुक्यात जोरदार सुरू आहे.
हवेली तालुक्यातील सहकारातील सर्वांत मोठ्या संस्थेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची नामनिर्देशनपत्रे भरण्याची सुरुवात सोमवार (दि. 27) पासून सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीसह भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार नेहमीप्रमाणे मैत्रीपूर्ण लढत किंवा 'जो निवडून येईल तो आमचा' हे धोरण राबवत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधीपासूनच भाजप-शिवसेनेला बरोबर घेऊन सर्वपक्षीय आघाडीची तयारी केली आहे.
जवळजवळ त्यांचे पॅनेल तयार झाले आहे. केवळ घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. सध्या तालुक्यात अजित पवार यांनी सहकारातील निवडणुकीत व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ठोस निर्णय न घेतल्याने तालुक्यातील आमदारांच्या विरोधातील गट प्रबळ बनत गेला व त्या गटाला भाजपने रसद पुरवली. हे गट राष्ट्रवादीत राहून भाजपला मदत करीत गेले. हळूहळू हा गट प्रबळ झाला. पक्षाच्या कोणत्याही बैठकांना हजर नाही, कोणत्याही कार्यक्रमात हे सहभागी नाही, केवळ अजित पवारांना दाखविण्यापुरते ते येतात.
राष्ट्रवादीचे हवेली तालुक्यातील शिरूर-हवेली, हडपसर, वडगाव शेरी, पुरंदर-हवेली, खडकवासला या विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीची पक्षविरोधी ताकद वाढत गेल्याने प्रत्येक निवडणुकीत पक्षाला याचा तोटा होणार आहे. परिणामी, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांविरोधात हे गट पूर्ण ताकदीनीशी विरोधी उमेदवारांना रसद पुरविण्यात यशस्वी होतील. त्यामुळे चार विद्यमान आमदारांना अजित पवारांच्या धोरणाचा तोटा सहन करावा लागणार आहे, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपला एक नवीन चेहरा मिळणार असल्याची चर्चा सध्या हवेली तालुक्यात जोरदार सुरू आहे. अजित पवार हवेली तालुक्यात नेहमी घेणारी दुटप्पी भूमिका स्वीकारणार की त्यांच्या स्वभावाला साजेसे असणारे परखड ठोस निर्णय घेणार, यावर देखील काही आमदारांचे भवितव्य अवलंबून आहे.
राष्ट्रवादीच्या सहकारातील नेत्याची स्वतंत्र पॅनेलची मागणी
राष्ट्रवादीच्या तालुक्यातील सहकारातील सर्व नेत्यांनी राष्ट्रवादीपुरस्कृत पॅनेलची जोरदार तयारी केली आहे. यामध्ये तालुक्यातील चार आमदारांनी खुद्द अजित पवारांना पक्षाचा स्वतंत्र पॅनेल करण्याबाबत आग्रह धरला आहे. जर पॅनेल टाकला नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम पक्षाला भोगावे लागतील; म्हणजे विधानसभेला फटका बसू शकतो, याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे.