पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांचा पुन्हा एकदा अवमान केला आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका दुटप्पी आहे. सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, म्हणजे काय करणार, हे ठाकरे यांनी सांगावं. नुसतं बोलून काय होणार, कृतीतून दाखवून द्या, महाविकास आघाडीतून बाहेर पडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. २७ ) उद्धव ठाकरे यांना दिले. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध केला जाईल, तसेच राज्यात सावरकर गौरव यात्रा काढवी जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मी सावरकर नाही, गांधी आहे. मी माफी मागणार नाही, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (दि. २७) पत्रकार परिषदेत निषेध केला. यापुढे सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देऊन सावरकरांच्या सन्मानार्थ राज्यात 'सावरकर गौरव यात्रा' काढणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली.
शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे; परंतु त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्या विधानावर वेगळीच भूमिका मांडत आहेत. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते, असे त्यांनी म्हटले आहे. हे म्हणजे दुटप्पी भूमिका असल्याची टीका शिंदे यांनी केली. परदेशात जावून आपल्या देशाची निंदा करणे चुकीचे आहे. आम्ही राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निषेध करतो. सावरकरांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. अशा देशभक्ताचा अवमान केल्यास जनता रस्त्यावर उतरेल. राज्यातील जनतेमध्ये चीड आणि संतापाची भावना आहे. राहुल गांधींची खासदारकी कायद्याने गेली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :