पुढारी ऑनलाईन : एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत राजीव रंजन उर्फ लालन सिंह यांनी जनता दल (युनायटेड) च्या अध्यक्षपदाचा दिल्लीतील पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनामा दिला. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जनता दल (युनायटेड) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
लालन सिंह यांनी त्यांच्या भाषणात पद सोडण्याचे कारण स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि सक्रिय राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पदावरुन पायउतार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून प्रस्ताव पुढे केला. त्यानंतर काही मिनिटांत नवे पक्ष प्रमुख म्हणून नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
जेडीयूचे सरचिटणीस राम कुमार शर्मा यांनी सांगितले की, "लालन सिंह यांनी सर्वप्रथम त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला आणि तो स्वीकारण्यात आला. त्याचबरोबर नितीश कुमार हे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, असा ठरावही मंजूर करण्यात आला."
या हालचालीचा राजकीय क्षेत्रातील अनेकांनी आधीच अंदाज व्यक्त केला होता. कारण गेल्या काही दिवसांपासून जेडीयूमध्ये संभाव्य बदलाबाबतच्या चर्चा सुरु होत्या. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही लालन सिंह यांनी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांच्याकडे JDU अध्यक्षपदाची देण्यात आलेली जबाबदारी एक धोरणात्मक रणनिती मानली जात आहे. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काही दिवसांनी ही घडामोड समोर आली आहे. नितीश कुमार यांच्या नवीन भूमिकेमुळे त्यांना युती आणि बिहारसाठी जागावाटप फॉर्म्युला यावर वाटाघाटी करण्यासाठी अधिक ताकद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून समर्थन दिले असतानाही जेडीयूच्या अनेक नेत्यांचा नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पुढे करण्याचा प्रयत्न आहे.
हे ही वाचा :