Priyanka Gandhi : प्रियांका गांधीही ईडीच्या रडारवर?   | पुढारी

Priyanka Gandhi : प्रियांका गांधीही ईडीच्या रडारवर?  

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : एका जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहारात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे नाव सक्तवसुली संचालनालयाकडुन (ईडी) आरोपपत्रात आले आहे. हरियाणामधील फरीदाबाद येथे एक शेतजमीन विकत घेतल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात प्रियंका गांधी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपुरात होत असलेल्या मोठ्या सभेपुर्वी ही माहिती समोर आली आहे. काँग्रेसने मात्र आकसाच्या भावनेने हा प्रकार होत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यामध्ये प्रियंका गांधींवर थेट आरोप नाहीत मात्र त्यांची यात भूमिका आहे, असे ईडीचे मत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या आरोपपत्रामध्ये यापूर्वीच प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे नाव घेतले गेले आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी एच एल पाहवा नामक एका रिअल इस्टेट एजंटकडून हरियाणातील फरीदाबाद येथे ४० एकर जमीन विकत घेतली होती. तीच जमीन एजंटने एका अनिवासी भारतीय असलेल्या सीसी थंपी नामक व्यावसायिकालाही विकली होती. दरम्यान, या प्रकरणात सीसी थंपी यांच्यासह सुमित चढ्ढा, संजय भंडारी आणि काही इतर लोकांची नाव आहेत.

दरम्यान, या प्रकरणात सीसी थंपी हे रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्ती मानले जातात. तसेच रॉबर्ट वाड्रा आणि सीसी थंपी यांनी फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. अशीही माहिती ईडीने दिली आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असताना काँग्रेससाठी हा झटका मानला जातो. काँग्रेसने या प्रकरणावर खेद व्यक्त करत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारच्या अनेक कारवायांना यापूर्वी पक्ष सामोरा गेला आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.  यासंदर्भात बोलताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांची नावे ईडीसोबत जोडली जातात. तर, काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, हे पहिल्यांदा होत नाही आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका समोर असतात तेव्हा अशा गोष्टी होतात. आम्ही अशा गोष्टींना भीक घालत नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर नाव न घेता हल्ला चढवला.

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सभेसाठी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी नागपूरला जाणार होत्या. मात्र सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या नागपुरला जाऊ शकल्या नाहीत. सोनिया गांधींसोबत प्रियंका गांधी देखील दिल्लीतच थांबल्या.

Back to top button