AUS vs NED : ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँडला 309 धावांनी चिरडले

AUS vs NED : ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँडला 309 धावांनी चिरडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 24 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा तब्बल 309 धावांनी पराभव करून विक्रमी विजय मिळवला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. स्पर्धेतील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर कांगारूंचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा 5 सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. डच संघाने द. आफ्रिकेविरुद्धचा एकमेव सामना जिंकला आहे. (AUS vs NED)

ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा स्वतःचाच विक्रम मोडला. 2015 मध्ये पर्थमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 275 धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम भारताच्या नावावर आहे. 2023 मध्ये तिरुअनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध 317 धावांनी विजय मिळवला होता.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ गडी बाद 399 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 21 षटकांत 90 धावांत गारद झाला.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडने कांगारू गोलंदाजांसमोर अक्षरश: लोटांगण घातले. 28 धावांवर संघाला पहिला धक्का बसला, त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. नेदरलँड्सकडून विक्रमजीत सिंगने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्यानंतर मॅक्स औडौड (6), कॉलिन एकरमन (10), बास डी लीडे (4), सायब्रँड एंजेलब्रेक्ट (11) आणि लोगान व्हॅन बीक (0) काही विशेष करू शकले नाहीत आणि ते लवकर बाद झाले. नेदरलँडचे 6 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने 4, मिचेल मार्शने 2 बळी घेतले. तर कमिन्स, स्टार्क, हेजलवूड यांना 1-1 विकेट मिळाली.

मॅक्सवेलचे सर्वात जलद शतक

स्फोटक फलंदाज मॅक्सवेलने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक वेगावान शतक (40 चेंडू) ठोकले. त्याने 240.91 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि फक्त 44 चेंडूत 106 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याचे हे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक आहे.

मॅक्सवेलचे विक्रम

मॅक्सवेल (138) वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. आता फक्त रिकी पाँटिंग (159) आणि अॅडम गिलख्रिस्ट (148) त्याच्या पुढे आहेत. याशिवाय मॅक्सवेलने पॅट कमिन्ससह वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सातव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा (103) विक्रमही केला. या दोघांनी स्टीव्ह स्मिथ आणि नॅथन कुल्टर-नाईल (102 विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019) यांचा विक्रम मोडला.

वॉर्नरचे सलग दुसरे शतक

नेदरलँड्सच्या अननुभवी गोलंदाजांची धुलाई करत वॉर्नरने शानदार खेळी केली. या सामन्यात त्याने 111.83 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 93 चेंडूत 104 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 22 वे शतक ठरले. तर या विश्वचषकातील त्याचे हे सलग दुसरे शतक ठरले. गेल्या सामन्यात त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध शतक झळकावले होते. (AUS vs NED)

वॉर्नरने तेंडुलकरची बरोबरी केली

वॉर्नरने (6) बुधवारी एकदिवसीय विश्वचषकातील सहावे शतक झळकावले. यासह, त्याने सचिन तेंडुलकरसह विश्वचषकात संयुक्तपणे दुसरे सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज पाँटिंग आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (5-5) तिसऱ्या स्थानावर आहेत. तर या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा 7 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने नेदरलॅन्डसला 400 धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ गडी बाद 399 धावा केल्या होत्या. कांगारू संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विक्रमी शतके झळकावली. वॉर्नरने सहावे शतक झळकावून माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. तर, मॅक्सवेलने शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती खेळी करत अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला.  (AUS vs NED)

वॉर्नर आणि मॅक्सवेल व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने 71 आणि मार्नस लॅबुशेनने 62 धावा केल्या. जोश इंग्लिशने 14 आणि कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद 12 धावा केल्या. मिचेल मार्श नऊ धावा करून आणि कॅमेरून ग्रीन आठ धावा करून बाद झाले. मिचेल स्टार्क खातेही उघडू शकला नाही. एडन झाम्पाने एक धाव घेतली. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बास डी लीडने दोन बळी घेतले. तर आर्यन दत्तने एक विकेट घेतली. (AUS vs NED)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news