नांदेड : पावडेवाडीत आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी; मराठा समाजाने घेतली शपथ | पुढारी

नांदेड : पावडेवाडीत आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी; मराठा समाजाने घेतली शपथ

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचे आंदोलन आता पुन्हा पेटत असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक गावातील मराठा समाजबांधवांनी पुढाकार घेतला आहे. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पावडेवाडी येथील नागिरकांनी बुधवारी (दि.25) राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रवेशबंदी असा फलक लावत जोरदार आंदोलन केले तसेच आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशी सामूहिक शपथही घेतली.

नांदेड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले पावडेवाडी हे गाव राजकीय दृष्टया नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महत्वाचे मानले जाते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपमधील अनेक तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकारी हे पावडेवाडी गावचे नागरिक आहेत. त्यामुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात पावडेवाडीचे वजन नेहमीच भारी ठरले आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक वारसा या गावाने समृध्दपणे जोपासला आहे.

आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने पावडेवाडी गाव चर्चेत आले असून राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणार्या गावातच राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पावडेवाडीच्या अवती भवती सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा वावर असतो, आता गावबंदी केल्याने या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी येथील मराठा समाजबांधवांनी केली असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा देण्यात आला असून आजी माजी आमदार, खासदार यांच्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी कायम राहिल ,असा निर्धार करत सामूहिक शपथही घेण्यात आली.

हेही वाचलंत का?

Back to top button