पुढारी ऑनलाईन डेस्क : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (AUS vs ENG) विश्वविजेत्या इंग्लंडचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडवर २-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला वनडे सामना ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून जिंकला होता. दुसर्या वन डेमध्ये प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत आठ गडी गमावून २८० धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ९४ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३८.५ षटकांत २०८ धावांवर गारद झाला. सॅम बिलिंग्सने सर्वाधिक ७१ धावा केल्या. मिचेल स्टार्कला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन (AUS vs ENG) संघाची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. डेव्हिड वॉर्नर १६ धावा करून आणि ट्रॅव्हिस हेड १९ धावांवर बाद झाला. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. स्मिथने एकदिवसीय कारकिर्दीतील २८ वे आणि लबुशेनने सहावे अर्धशतक झळकावले.
आदिल रशीदने ही भागीदारी तोडली. ५५ चेंडूत ५८ धावा करून मार्नस लॅबुशेन बाद झाला. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. आदिक रशीदने ॲलेक्स कॅरीला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ११४ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह ९४ धावा काढून स्टीव्ह स्मिथ बाद झाला. त्यालाही आदिल रशीदने बाद केले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या षटकात संघाने शून्यावर दोन गडी गमावले होते. सलामीवीर जेसन रॉय आणि डेव्हिड मलान यांना खातेही उघडता आले नाही. स्टार्कने दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जेम्स विन्स आणि फिलिप सॉल्ट यांनी ३४ धावांची भागीदारी केली. सॉल्ट २३ धावा करून बाद झाला. यानंतर विन्स आणि बिलिंग्स यांनी चौथ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली.
विन्स ७२ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाला. तर बिलिंग्ज ८० चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे बाद होताच इंग्लंडचा डाव गडगडला. कर्णधार मोईन अली १० धावांवर, ख्रिस वोक्स सात धावांवर, सॅम करन शून्य, लियाम डॉसन २० धावांवर आणि डेव्हिड विली सहा धावांवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. जोस हेजलवूडने दोन विकेट घेतल्या.
हेही वाचा;