जमीन ही पिकांना लागणारी अन्नद्रव्ये, पाणी पुरवणारे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. वनस्पतीच्या उत्तम वाढीसाठी पाणी तर आवश्यक आहेच. शिवाय हवा आणि अन्नद्रव्ये यांचा विशिष्ट प्रमाणात पुरवठा झाला पाहिजे. वनस्पतींना मिळणारे पाणी जमिनीतून झिरपून पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचते. मुळांच्या जवळपासचा भाग पाण्याने भरला जातो. मुळांना लागणारी हवा आणि पाणी यांना जमिनीतल्या मातीच्या कणांभोवती एकाच ठिकाणी रहावे लागते आणि या दोन्हीची गरज पिकांना आणि मुळांना सतत असते. म्हणून याचे जमिनीतील प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. जमिनीतील पाण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी आणि हवेचे प्रमाण जास्त झाले तर पिकांना पाणी कमी मिळून ती मरू लागतात.
याउलट परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे पाण्याचे प्रमाण जास्त आणि जमिनीतील हवेचे प्रमाण कमी झाले तर पिके हवेविना गुदमरून मरू लागतात. म्हणजे पिकांना केवळ पाणी जास्त झाले म्हणून ती मरत नाहीत, तर त्यांना हवा किंवा प्राणवायू कमी मिळू लागला म्हणजेही ती गुदमरतात. म्हणूनच पिकांच्या उत्तम वाढीसाठी मातीच्या कणांभोवतालच्या पोकळीत हवेचा आणि पाण्याचा समतोलपणा असला पाहिजे. यासाठी जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे.
जेव्हा जमिनीवर पाऊस सतत पडत असतो किंवा तिला ओलिताद्वारे पाणी दिले जाते, तेव्हा मातीतल्या पोकळीतली हवा बाहेर फेकली जाऊन त्या जागी पाणी साचले जाते. जमिनीतील पाणी अगदी थबथबून भरले गेल्यावरही पाऊस किंवा पाणी देणे तसेच चालू राहिले तर पाणी जमिनीत न राहता ते तळ जमिनीवाटे किंवा पृष्ठभागावरून वाहू लागते. जमिनीच्या पोकळीतून किंवा पृष्ठभागावरून वाहून गेलेल्या अनावश्यक पाणी आणि क्षाराला 'निचर्याचे पाणी' असे म्हणतात.
निचर्याचे पाणी अनावश्यक असल्यामुळे अर्थातच त्याचा पिकांना काहीही उपयोग नसतो आणि ते बाहेर काढले नाही तर मुळांभोवतीच्या मातीतच साचून राहते. अतिपावसामुळे वरच्या उताराच्या भागातून पाणी झिरपत येऊन जास्तीच्या प्रमाणात पाणी साचून जमिनीत दलदल तयार होते. जमिनीच्या वरच्या थरातून पाणी वाहून गेल्याने जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. हे क्षार जमिनीच्या खालच्या भागातून केशकर्षाने पाण्याद्वारे आणले जाऊन साठवले जातात. जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनीतील पाणी, क्षार आणि हवा यांचा समतोल राखला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो.त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते.
निचरा असलेल्या जमिनीत क्षारांचे प्रमाणही बहुधा जास्त असते. या क्षारांचाही मुळांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. सोडीअम अन्नाशांचे प्रमाण मुळात जास्त झाल्यास मुळे आखूड राहतात आणि ते कार्यरत नसतात. निचरा नसलेल्या किंवा पाणथळ जमिनीतल्या पिकांची मुळे खालून कुजत असलेली दिसतात आणि त्याचा व्यापही मर्यादातच असतो; परंतु चांगला निचरा असलेल्या जमिनीत वाढणारी मुळे लांब वा पांढुरकी असून त्यांना भरपूर फुटवे असतात.
जमिनीचा निचरा बिघडला तर ती थंड राहते आणि निचरा योग्य असल्यास जमिनीचे तापमान वाढते. कारण एका विशिष्ट वजनाचे पाणी तापवण्यास जितकी उष्णता लागते तिच्या 1/5 उष्णतेने तितक्याच वजनाची माती तापू शकते. थंड जमिनीत उसासारख्या पिकांची उगवण बरोबर होत नाही आणि उगवून आल्यानंतरही त्यांच्या मुळांची वाढ चांगली होत नाही. गरम आणि आर्द्र जमिनीत बियांची किंवा बेण्याची उगवण उत्कृष्ट असते. नत्राशांचे शोषण आणि पिकांची वाढ ही मुख्यता मुळाभोवतालच्या जमिनीच्या तापमानावर अवलंबून असते. तसेच मुळांभोवतालच्या थंड तापमानामुळे काही पिकांची रोगप्रतिकार शक्तीही कमी होते. मर, मुळ्या, कुजणे आणि काही प्रकारचेे रोग अशाच परिस्थितीत उद्भवतात.
पिकांच्या मुळांना हवेची किंवा प्राणवायूची गरज असते. योग्य निचर्याअभावी जमिनीत हवा मर्यादित झाली म्हणजे जमिनीतल्या नायट्रेटसारख्या सुलभ नत्रांशाचे दुर्लभ अशा नत्राशांत रूपांतर होऊन मुळांकडून इतर अन्न शोषणाचे कार्यही बरोबर होत नाही आणि त्यामुळे जमिनीवरच्या पिकांचे भाग चांगले वाढत नाहीत. मूळ असलेल्या जमिनीच्या भागात कमी हवा खेळत राहिली तर त्याचा परिणाम पालांशाच्या शोषण क्रियेवर होतो. नंतर नत्र, स्फुरद आणि चुना अन्नाशांच्या शोषणावर होतो. यामुळे जमिनीत पालांश या द्रव्यांचा भरपूर साठा असूनही त्याचा अभाव पिकांवर दिसू लागतो. जी पिके निचरा बरोबर नसलेल्या जमिनीत वाढतात, त्यांची पाने गर्द हिरवी नसून फिकी आणि निस्तेज असतात.
भरपूर खत, पाणी आणि आवश्यक त्या रोगजंतूनाशक औषधांचा उपयोग करूनसुद्धा बरेचदा पिकांची वाढ व्यवस्थित झालेली आढळून येत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीला पावसाद्वारे किंवा ओलिताद्वारे मिळणार्या पाण्याची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे जमिनीची बिघडलेली भौतिक अवस्था ही पिकांची वाढ खुंटण्याचे मुख्य कारण आहे. ज्या ठिकाणी निचरा व्यवस्थित झाला नसेल, त्या ठिकाणी अशी अवस्था उद्भवते. पाण्याचा अतिवापर केल्यामुळे पिकांची वाढ होण्याऐवजी प्रतिवर्षी जमिनीचा पोत आणि रासायनिक स्थिती असंतुलित होऊन पिकांवर अनिष्ट परिणाम होतो.
जेव्हा जमिनीतील पाण्याची पातळी वाढून तिचा निचरा बिघडण्यास सुरूवात होते तेव्हा प्रथम खोलवर असलेल्या मुळांना प्राणवायू कमी पडल्यामुळे ती निष्क्रिय बनू लागतात. जमिनीमध्ये पाणी साठून ते संथ राहिले असेल त्यावेळी हा परिणाम जास्त दिसतो; परंतु पाणी वाहते असेल तर परिणाम कमी प्रमाणात दिसून येतो. कारण वाहत्या पाण्यातून सुद्धा पिकांना लागणार्या प्राणवायूचा चांगला पुरवठा होऊ शकतो. जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा न होण्याने जमिनी खार्या होतात. असे होऊ नये यासाठी जमिनीतील पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे.
– अनिल विद्याधर