नवाजुद्दीनच्या ‘हड्डी’ चं नवीन पोस्टर पाहिलंत का? या अवतारात पाहून चाहतेही झाले अवाक | पुढारी

नवाजुद्दीनच्या 'हड्डी' चं नवीन पोस्टर पाहिलंत का? या अवतारात पाहून चाहतेही झाले अवाक

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या व्यक्तिरेखांमध्ये सतत प्रयोग असलेल्या अभिनेत्यांमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीचं नाव सगळ्यात वर आहे. त्याने आजवर अनेक नेहमी पेक्षा वेगळ्या व्यक्तिरेखा स्विकारल्या आहेत आणि त्यांना न्याय पण दिल्या आहेत. पण त्याच्या आगामी सिनेमात मात्र आतापर्यंतची सगळ्यात हटके अशी व्यक्तिरेखा साकारताना तो दिसणार आहे. ‘हड्डी’ असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात तो ट्रान्सजेंडर व्यक्तिरेखेत दिसतो आहे. या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरनेच खळबळ उडवली होती.

यामध्ये शिमर वनपीस घातलेला नवाजुद्दीन कमालीचा मादक दिसतो आहे. अर्थातच यातही त्याचा ट्रान्सजेंडर लूक दिसतो आहे. पण या पोस्टरमध्ये थरकाप उडवणारी गोष्ट होती ती म्हणजे रक्ताने माखलेले हत्यार. ऑगस्टमध्ये हड्डीच पोस्टर रिलीज झालं होतं. ‘गुन्हा यापेक्षा सुंदर यापूर्वी कधीच नव्हता’ असं कॅप्शन या फोटोला त्याने दिलं होतं. आता त्याने या सिनेमाचं दुसरं पोस्टर शेयर केलं आहे. यापूर्वी पेक्षा वेगळा असा लुक त्याचा नवीन रिलीज झालेल्या सिनेमात दिसतो आहे. यावेळी शेयर केलेल्या पोस्टरमध्ये तो साडी, नाथ, टिकली अशा पारंपरिक अवतारात दिसतो आहे. नवाजुद्दीनचा हा सिनेमा रिव्हेंज ड्रामा आहे.

यापैकी एका फोटोत तो थेट कॅमेराकडे पाहतो आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याच्यासोबत इतर ट्रान्सजेंडर्स ही दिसत आहेत. तृतीयपंथीयांसोबत काम करण्याचा अनुभव हा खास होता अशा आशयाचं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. यासोबतच त्याने २०२३ मध्ये हा सिनेमा रिलीज होणार असल्याची घोषणा केली आहे. तृतीयपंथीयांच्या जीवनावर बेतलेला आणि यावर्षी चर्चेत असलेला हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी सुश्मिता सेनने ताली या सिनेमाची घोषणा केली होती. यामध्येही ती तृतीयपंथीयाच्या व्यक्तिरेखेत दिसते आहे. हा सिनेमा गौरी सावंतच्या जीवनावर बेतला आहे.

Back to top button