१ हजार नव्‍हे ३ हजार कोटींचा घोटाळा, आशिष शेलारांकडून भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुन्‍हा आरोप

१ हजार नव्‍हे ३ हजार कोटींचा घोटाळा, आशिष शेलारांकडून भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुन्‍हा आरोप
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

वांद्रे पश्‍च‍िम बॅन्‍डस्टॅण्ड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्‍डरच्‍या घशात घालून सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा करण्‍यात आला आहे. विशेष बाब म्‍हणजे या पंचतारांकित जागेवर "एसआरए" योजना दाखवण्यात आली. एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्‍डरला देण्‍यात येणार असल्‍याचा गंभीर आरोप भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज येथे केला. आघाडी सरकार हे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' आहे, असा टोला आमदार ॲड. आशिष शेलार यांनी लगावला.

भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दि. ५ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन हा भूखंड घोटाळा उघड केला होता. त्‍यावेळी त्‍यांनी या प्रकरणात १ हजार कोटींचा घोटाळा असल्‍याचा आरोप केला होता. त्‍याबाबत खुलासा उपनगर जिल्‍हाधिकाऱ्यांनी करुन यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारे घोटाळा झाला नसल्‍याचे प्रसिध्‍दीपत्रक जारी केले होते. त्‍या खुलाशाला आज उत्‍त्तर देणार नाही. योग्‍य वेळी आपण त्‍यावर बोलू असे त्यांनी सांगितले. आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज पुन्‍हा दादर वसंत स्‍मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याच घोटाळयातील आणखी एक गंभीर बाब उघड करुन नवीन आरोप केले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात बँन्डस्टॅण्ड परिसरात असणाऱ्या ताज हॉटेलच्या शेजारील १ एकर ५ गुंठे हा भूखंड सन १९०५ पासून THE BANDRA PARSI CONVALESCENT HOME FOR WOMEN & CHILDREN CHARITABLE TRUST भाडे पट्यावर देण्यात आला होता. आजारी रुग्णांना बरे करण्यासाठी ही राखीव जागा या ट्रस्टला देण्यात आली होती. या ट्रस्टने सदर कामासाठी जागेचा वापर केलाच नाही. तर सदर जागेचा भाडेपट्टा हा १९८० साली संपला. मुंबई महापलिकेच्या २०३४ च्या विकास आराखड्यात या जागेचे आरक्षण Rehabilitation Centre असे आहे.

या ट्रस्टचा भाडेपट्टा करार संपल्यामुळे ही जागा सरकारच्या ताब्यात येण्याची प्रक्रिया होत असतानाच २०२० साली ही जागा विकण्याची जाहीरात काढण्यात आली. त्यानंतर २०२२ पर्यंत सरकारने ही जागा विकण्याच्या सर्व परवानग्या दिल्या.

वास्‍तविक या जागेवर ऐतहासिक दर्जा असलेली वास्‍तू होती ती तोडून तसेच याबाबत कोणत्‍याही परवानग्‍या न घेताच हा भूखंड रुस्‍तमजी या बिल्‍डरच्‍या घशात घालण्‍यात आला. असाच काही वर्षापूर्वी ऐतहासिक वास्‍तूचा दर्जा असलेली क्रॉफर्ड मार्केटचा भूखंड बिल्‍डरच्‍या घशात घालण्‍यात येत असताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी त्‍याला विरोध केल्‍याने तो भूखंड अखेर वाचला होता. तसाच एक घोटाळा आता वांद्रे येथील जागेचा सुरू असल्‍याचे त्‍यांनी आता उघड केले आहे.

आज याबाबत नवीन माहिती उघड करताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, या भूखंडावर १६८ कायमस्‍वरुपी संक्रमण शिबिरातील घरे बिल्‍डर बांधून देणार, असे दाखवून सदर मोकळया भूखंडावर एसआरए योजना राबविण्‍याची परवानगी सरकारकडून देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे संक्रमण शिबिराच्‍या नावाखाली विकासकाला एसआरए योजनेचे फायदा देण्‍यात येणार आहेत.

सदर भूखंड मोकळा भूखंड म्‍हणून विकसित केला तर विकासकाला १ लाख ९० हजार चौरस फूट एवढे क्षेत्रफळ विक्रीसाठी मिळणार होते. मात्र या जागेवर एसआरए दाखवून ३३ (११) अंतर्गत विकास केल्‍यास विकासकाला ३ लाख चौरस फूट एवढे प्रचंड क्षेत्रफळ विक्रीस मिळणार आहे. जर हा भूखंड मोकळा भूखंड म्‍हणून विकसित केला तर २ एफएसआय मिळाला असता. पण, एसआरए योजनेत दाखविल्‍यामुळे आता ४ एफएसआय बिल्‍डरला मिळणार आहे. सरकारकडून अशा प्रकारे ४ एफएसआयची खैरात तसेच मालकी हक्‍काने भूखंड बिल्‍डरला दिल्‍यामुळे ४२ मजली टोलेजंग टॉवर या जागेवर उभा राहणार आहे. यामुळे विकासकाला सुमारे ३ हजार कोटींचा फायदा होणार आहे. या बदल्‍यात सरकारला २८ कोटी भरुन हा भूखंड केवळ २३४ कोटीला मालकी हक्‍काने बिल्‍डरला मिळणार आहे. म्‍हणजे कवडीमोल किंमतीत हा भूखंड विकासकाच्‍या घशात घालण्‍यात येतो आहे. हेच "का ते तुमचे करुन दाखवले" असा टोलाही आमदार अॅड. आशिष शेलार यांनी लगावला आहे.

या संपूर्ण प्रकरणात धर्मदाय आयुक्‍त, एसआरए, उपनगर जिल्‍हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगरपालिका यांचा सहभाग आहे. र्व प्रशासकीय कार्यालयातून ज्‍या वेगाने परवानग्‍या देण्‍यात येत आहेत. ते पाहता मंत्रालयातील कोणी उच्‍च पदस्‍थच ही सू हलवित आहे हे अधोरेखित होते. त्‍यामुळे तातडीने या प्रकरणाची चौकशी व्‍हावी. एसआरएकडून या भूखंडावरील योजनेला परवानगी देण्‍यात येऊ नये,अशी मागणी ही शिष शेलार यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news