पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (दि.१२) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Rozgar Mela) केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या १ लाखांहून अधिक तरूणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. "विकसित भारताच्या प्रवासात प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे. नवीन सामील झालेले एक लाख कर्मचारी आम्हाला नवी ऊर्जा देतील," असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी नियुक्त तरूणांचे अभिनंदन केले.
संबंधित बातम्या :
महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग, संरक्षण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य मंत्रालय, यासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये या नवीन भरती करण्यात आल्या आहेत. यावेळी तरूणांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, "हे यश तुम्ही कठोर परिश्रमाने मिळवले आहे. मी तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन करतो. पूर्वीच्या सरकारांमध्ये नोकरीच्या जाहिराती देण्यापासून ते नियुक्तीपत्र देण्यापर्यंत बराच वेळ लागत असे. या दिरंगाईचा फायदा घेत त्या काळात लाचखोरीचा खेळही रंगला होता. आम्ही आता भारत सरकारमधील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक केली आहे. भरती प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सरकार खूप आग्रही आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाला आपली क्षमता सिद्ध करण्याची समान संधी मिळू लागली आहे, असे ते म्हणाले.
२०१४ पासून आम्ही तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचा प्रयत्न केला. आमच्या आधीच्या सरकारांच्या तुलनेत आम्ही १० वर्षांत १.५ पट अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज दिल्लीत एकात्मिक प्रशिक्षण संकुलाचेही उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे क्षमता वाढवण्याचा आमचा संकल्प आणखी मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. देशातील स्टार्टअप्सची संख्या आता १.२५ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. यापैकी मोठ्या संख्येने स्टार्टअप टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये आहेत. या स्टार्टअप्सच्या माध्यमातून तरुणांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण होत आहेत. यावेळच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्सना देण्यात आलेल्या करात सूट वाढवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आज या रोजगार मेळाव्याद्वारे भारतीय रेल्वेतही भरती केली जात आहे. भारतीय रेल्वे आज एका मोठ्या परिवर्तनातून जात आहे. या दशकाच्या अखेरीस भारतीय रेल्वेचा संपूर्ण कायापालट होणार असल्याचे मोदींनी सांगितले.
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी, भारत सरकारने 'कर्मयोगी भारत पोर्टल' देखील सुरू केले आहे. या पोर्टलवर विविध विषयांशी संबंधित ८०० हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आतापर्यंत ३० लाखांहून अधिक वापरकर्ते या पोर्टलमध्ये सामील झाले आहेत. या पोर्टलचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपले कौशल्य वाढवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
हेही वाचा :