नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मावळत्या लोकसभेचा कार्यकाळ सुधारणांचा (रिफॉर्म), कार्यक्षमतेचा (परफॉर्म) आणि बदलाचा (ट्रान्सफॉर्म) राहिला आहे. जे अनेक दशकांत घडले नाही ते या संसदेने करून दाखवले. लोकसभेच्या निवडणुकांना फार काळ उरलेला नाही. काहीजणांना चिंता वाटत असेल. परंतु आव्हाने असली तर मला आनंद वाटतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 17 व्या लोकसभेच्या समारोप भाषणातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप झाला. नव्या संसद भवनात दोन्ही सभागृहांमध्ये मावळत्या लोकसभेला निरोप देताना सर्वपक्षीय सदस्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निरोपाच्या भाषणादरम्यान मागील पाच वर्षांत सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा विजयाचा आत्मविश्वासही व्यक्त केला. पंतप्रधानांच्या भाषणानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले.
लोकसभा निवडणुकीला आता अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे संसदेतील समारोपाचे भाषण हे एकप्रकारे निवडणुकीचा बिगुल वाजविणारेही होते.
आव्हाने येतात तेव्हा अधिक आनंद
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्याला विकासाची कामे पुढे न्यावी लागतील. निवडणुका फार लांब नाहीत. हा लोकशाहीचा एक अत्यावश्यक पैलू आहे. आपल्या लोकशाहीने संपूर्ण जगाला चकित केले आहे. यापुढेही तशीच स्थिती राहील याची खात्री आहे. आव्हाने
येतात तेव्हा अधिक आनंद वाटतो. परमेश्वराची आपल्यावर कृपा राहिली आहे की, आव्हाने येतात तेव्हा आपली कामगिरी अधिक चमकदार होते, अशी सूचक टिप्पणीही पंतप्रधान मोदींनी केली.
भावी पिढ्यांसांठी कार्य करत राहू
राम मंदिराबाबत आज सभागृहाने मंजूर केलेला ठराव नव्या पिढीला या देशाच्या मूल्यांचा अभिमान बाळगण्याची घटनात्मक शक्ती देणारा आहे. खासदारांनी सभागृहात केलेल्या मत प्रदर्शनामध्ये सर्वांच्या सहकार्याची आणि सर्वांच्या विकासाची भावना असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले. नव्या जगामध्ये डेटा हा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने कायदा आणून डेटा संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचेही ते म्हणाले. सभागृह आपल्याला सतत चांगली कामगिरी करत राहण्याची प्रेरणा देत राहील. सामूहिक संकल्प आणि सामूहिक शक्तीने भारताच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण कार्य करत राहू, असा विश्वासही पंतप्रधानांनी बोलून दाखविला.
25 वर्षांत विकसित राष्ट्र
17 व्या लोकसभेची 97 टक्के उत्पादकता राहिल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पहिल्या अधिवेशनात 30 विधेयके मंजूर झाली हा आतापर्यंतचा विक्रम आहे. कोरोना काळात देशासमोरील स्थिती लक्षात घेऊन खासदारांनी मतदारसंघ विकास निधी देण्याच्या प्रस्तावाला एकमताने संमती दिली. तसेच देशवासीयांना सकारात्मक संदेश देण्यासाठी आणि समाजाला विश्वास देण्यासाठी खासदारांनी आपल्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. येत्या 25 वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे, असे सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील तरुणांसाठी 25 वर्षे हा महत्त्वाचा काळ आहे. विकास हा जनतेचा संकल्प झाला आहे. मागील पाच वर्षात तरुणांसाठी अनेक कायदे केल्याचे सांगताना परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात संमत केलेल्या कायद्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
पाच वर्षांतील प्रमुख कामे
संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा
भारतीय दंड संहितेतील सुधारणा करणारे कायदे
370 कलम हटविण्याचा निर्णय
जी-20 परिषदेचे यशस्वी आयोजन
महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी