नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना शुक्रवारी भारतरत्न घोषित करण्यात आला. यानंतर शनिवारी (दि. १०) राज्यसभेत राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख आणि चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी बोलायला उभे राहिले. नेमक्या याच वेळी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेप घेत चौधरी यांना कोणत्या नियमानुसार बोलण्याची परवानगी दिली, असा प्रश्न यांनी विचारला आणि यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खर्गे यांना चांगलेच सुनावले.
देशाचे माजी पंतप्रधान आणि जयंत चौधरी यांचे आजोबा चौधरी चरणसिंह यांचा सन्मान केल्याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी जयंत चौधरी उभे राहिले. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी यांना कोणत्या नियमानुसार बोलण्याची परवानगी दिली असा सवाल उपस्थित केला. त्यावर तुम्ही चौधरी चरणसिंह यांचा अपमान केला, त्यांच्या वारशाचा अपमान केला. तुमच्याकडे चौधरी चरणसिंहांसाठी वेळ नव्हता. त्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात असे वातावरण निर्माण करून तुम्ही देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दुखावत आहात. अशा शब्दात सभापती जगदीप धनखड यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना सुनावले.
या दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, नेत्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यावर आम्हाला वाद करायचा नाही. भारतरत्न घोषित झालेल्या सर्वांना सलाम करतो. मात्र जयंत चौधरी यांना मुद्दा मांडायचा असेल तर ते कोणत्या नियमानुसार बोलत आहेत, कोणत्या नियमानुसार त्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली, हे जाणून घ्यायचे आहे. आम्हालाही बोलण्याची परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही टिप्पणी केली. एकीकडे तुम्ही नियमांबद्दल बोलत आहात आणि नियमांचे पालन होत नाही, हे बरोबर नाही, असे खर्गे म्हणाले. आणि त्यामुळे सभापती जगदीप धनखड आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी झाली आणि सभागृहात काही काळ गदारोळ झाला.