Anil Gote | राजीनामा देवू नका, एकजुटीने भाजपचा उमेदवार पाडा : अनिल गोटेंचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आवाहन

Anil Gote | राजीनामा देवू नका, एकजुटीने भाजपचा उमेदवार पाडा : अनिल गोटेंचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आवाहन

Published on

धुळे पुढारी वृत्तसेवा- धुळे-मालेगाव मतदारसंघातून निवडून नवीन खासदाराचे देशाच्या नव्या पंतप्रधानांना दिलेले मत अत्यंत बहुमोल असेल. आपण करीत असलेली एकजूट ही केवळ भाजपाच्या उमेदवाराच्या विरूध्द निर्माण झालेल्या असंतोषाचे दर्शन घडविण्यासाठीच आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही एक जुटीचे प्रदर्शन घडवून भाजपाचा पराभव करावा असे आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी आज केले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये गटबाजीचे प्रदर्शन सुरू झाले. धुळ्याचे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर असंतोषाचे नाट्य सुरू झाले. या वादात आता लोकसंग्रामचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी नाराजी नाट्य करून गटबाजीचे प्रदर्शन केल्यापेक्षा भाजपाने दिलेल्या निष्क्रिय उमेदवाराचा पराभव करण्यासाठी एकजुटीचे प्रदर्शन करावे असे आवाहन केले आहे. आपले मत मांडत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टी तसेच खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर देखील टीका केली आहे.

कुणालाही उमेदवारी दिली, तरी लोक निवडुन देतील हा भाजपचा समज

भारतीय जनता पक्षाने खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी धुळे-मालेगाव लोकसभा मतदार संघातील मतदारांवर लादली आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे म्हणून दोनवेळा व राममंदिराच्या प्रश्नावर मतदार १९८९ पासून मतदान करीत आहेत. यामुळेच की काय, आपण कोणालाही उमेदवारी दिली तरी लोक निवडून देतील असे भाजपाने गृहीत धरूनच तोच उमेदवार दिला. मोदींच्या व राम मंदिराच्या प्रश्नावर कुणीही निवडून येईल. भाजपाच्या या आत्मविश्वासाला धुळे-मालेगाव मतदार संघातील मतदार दणका देण्यासाठी भाजपामधील असंतुष्टासह अन्य सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या काल मालेगाव येथे झालेल्या बैठकीत ठरवले. कॉग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार शोभाताई बच्छाव वास्तव्यास नाशिकवासी आहेत. नाशिकच्या महापौर होत्या. विधानसभेतही नाशिक जिल्हयातूनच निवडून आल्या होत्या. एवढेच नव्हे तर, त्यांचे स्वतःचे मतदानही धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघात नाही. त्या स्वतःलाही मतदार करू शकत नाही. असा उमेदवार चालूच शकत नाही. असे स्पष्ट मत उपस्थितांपैकी बहुतेकांनी व्यक्त केले.

पक्षातच राहून हे पवित्र कार्य करा

आपले मनोगत व्यक्त करतांना माजी आमदार अनिल गोटे यांनी पुढे सांगितले की, धुळे-मालेगाव मतदारसंघातून निवडून नवीन खासदाराचे देशाच्या नव्या पंतप्रधानांना दिलेले मत अत्यंत बहुमोल असेल. आपण करीत असलेली एकजूट ही केवळ निष्कीय खासदार डॉ. सुभाष भामरे विरूध्द निर्माण झालेल्या असंतोषाचे दर्शन घडविण्यासाठीच आहे. यासाठीच आपण एकत्र येत आहोत. काही पक्षातील जबाबदार नेत्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पण माझी सर्वच पक्षाच्या उपस्थित कार्यकर्त्यांना अत्यंत आग्रहाची विनंती आहे की, या एका उद्देशासाठी कुणीही आपल्या मूळ पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण आपल्या पक्षातच राहून हे पवित्र कार्य करू शकतो. उगाचच तुमचा पक्ष सोडू नका. आपण आहात त्याच ठिकाणी पक्के रहा. आपला संताप मर्यादीत आहे की, निष्कीय उमेदवारासाठी मते मागायची कशाच्या विश्वासावर?. मागील १० वर्षात खासदारांनी त्यांनी एकही काम केलेले नाही. तुम्ही धुळे महापालिकेची अक्षरशः वाट लावली. धुळे-मालेगाव लोकसभा मतदासंघातील सर्वच गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही. धुळे शहरात १७३ व १३६ कोटी असे ३०९ कोटी रूपये खर्ची टाकून आजही आठवडा-आठवडा पाणी येत नाही. रमजान महिन्यासारख्या पवित्र उपवासाच्या कालखंडात मुस्लिम बांधवांच्या वस्त्यांमध्ये चार-चार दिवस पाणी आले नाही. रोजगार मिळावा यासाठी दहा वर्षात एकही नवा उ‌द्योग आणला नाही. टेक्स्टाईल पार्क कुठे घालुन ठेवला?. झोडगा-मालेगाव एम. आय.डी.सी. चे काय झाले?, मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग होवू नये असेच प्रयत्न केले. तुमचे यावर एकमत असेल तर, आपण आपला पक्ष सोडू नका . असे आवाहनही अनिल गोटे यांनी केले आहे.

हेही  वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news