Nashik Onion Auction | आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, ७४ व्यापाऱ्यांना परवाने | पुढारी

Nashik Onion Auction | आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, ७४ व्यापाऱ्यांना परवाने

लासलगाव: पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठ दिवसापासून लेव्हीच्या मुद्दावरून बंद असलेल्या लासलगाव बाजार समितीत आजपासून (दि. १२) कांदा लिलाव पूर्ववत सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी बाजार समितीने ७४ व्यापाऱ्यांना परवाने दिले आहेत. परवानाधारक जुने व्यापारी सोबत आल्यास त्यांच्यासह अथवा ते आले नाही तरी त्यांच्याविना लिलाव पार पाडले जात आहेत.

लेव्ही वसुलीच्या वादातून सलग आठ दिवस ठप्प असणारे कांदा लिलाव लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी (दि. १२) सकाळपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात १६ हजार क्विंटलची आवक होऊन त्यास सरासरी दीड हजार रुपये भाव मिळाला. इतर बाजार समित्यांमध्ये मात्र कृषिमालाचे व्यवहार अद्याप देखील सुरू झालेले नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी कायम राहीली आहे.

आजपासून (दि. १२) सुरू होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत व्यापारी सहभागी होणार का? याकडे बाजार समिती प्रशासनाचे लक्ष लागले होते. मात्र पर्यायी व्यवस्था म्हणून बाजार समितीने नवीन व्यापाऱ्यांना परवाने देऊन लिलाव सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद असल्याने लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झालेली आहे. व्यापारी असोसिएशनची बैठकनुसार काही मुद्दांवर चर्चा करण्यात आली. कांदा लिलाव सुरु होणार असले तरी धान्य लिलाव मात्र सुरु होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. परिणामी लेव्हीचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. तर आजपासून सुरु झालेल्या लिलावात सकाळच्या सत्रात कांद्याची ५५० वाहने (अंदाजे १६ हजार क्विंटल) आवक झाली. त्यास किमान एक हजार ते कमाल तीन हजार आणि सरासरी दीड हजार रुपये भाव मिळाला. लिलावात ४० व्यापारी सहभागी झाले हाेते. तर लासलगाव बाजार समितीत एकूण २२९ व्यापारी आहेत. मात्र लेव्ही कपातीला नकार देणारे ४० ते ५० प्रस्थापित व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांमध्ये काही विंचूर उपबाजारातील आणि काही नवीन व्यापारी असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांचा फायदा बघता व्यापारी हे प्रचलित पद्धतीने सहभागी न झाल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था उभारण्याची सूचना करण्यात आलेली आहे. व्यापारी सहभागी न झाल्यास परवाना रद्द करण्याची तयारी देखील करण्यात आली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी परवान्यासाठी बाजार समितीकडे मागणी केली आहे, त्यांना तत्काळ अनुज्ञाप्ती (संमती) देण्यात येणार आहे. कांदा व्यापाऱ्यावर ठराविक व्यापाऱ्यांची सद्दी आहे. लेव्हीच्या प्रश्नावरून त्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरल्याची तक्रार होत आहे. लासलगाव बाजार समितीत काही व्यापाऱ्यांच्या सोबतीने लिलाव सुरू झाले आहे. तशीच कार्यपद्धती अन्य बाजार समित्यांमध्ये अवलंबून कृषिमालाचे लिलाव पूर्ववत करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा:

Back to top button