महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळवणूक प्रकरणी दिल्ली पोलिसांनी समितीकडून मागविला अहवाल

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळवणूक प्रकरणी दिल्ली पोलिसांनी समितीकडून मागविला अहवाल
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळवणूक प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने चौकशी समिती नेमली होती. कुस्तीपटूंनी छळवणूक प्रकरणावरुन पुन्हा एकदा आंदोलनास सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी समितीकडून चौकशीचा अहवाल मागविला आहे.

कुस्ती संघटनेचे अध्यक्ष (WFI) बृजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळवणुकीचा गंभीर आरोप झालेला आहे. सिंग यांच्याविरोधात आतापर्यंत सात तक्रारी आल्या असून यासंदर्भात चौकशी सुरु आहे. तपासाचा भाग म्हणून क्रीडा मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल मागविण्यात आला आहे, असे दिल्ली पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. सिंग यांच्याविरोधात ठोस पुरावे आढळले की त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असेही अधिकाऱ्याने नमूद केले.

तक्रारीची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसिध्द बॉक्सर मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली होती. बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रसिध्द कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आदींनी जंतर मंतरवर आंदोलनास नव्याने सुरुवात केली आहे. सिंग यांच्यावर जोवर कारवाई होत नाही, तोवर आंदोलन थांबणार नाही, असा इशारा कुस्तीपटूंनी दिलेला आहे.

ब्रिजभूषण यांच्‍यावर गंभीर आरोप

जंतर-मंतरवर कुस्‍तीपटूंनी १८ जानेवारी २०२३ रोजी आंदोलन केले होते. यावेळी त्‍यांनी ब्रिजभूषण शरण सिंह आणि महासंघावर लैंगिक शोषण, मानसिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि आर्थिक गैरव्यवहार यासह विविध आरोप केले होते. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हस्तक्षेप केला आणि कुस्तीपटूंच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी आणि WFI च्या दैनंदिन कामकाजाचा ताबा घेण्यासाठी एक तपास समिती स्थापन केली होती. पर्यवेक्षण समिती स्थापन करण्याआधी सरकारने त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही, असाही दावा त्‍यानी केला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news