पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसअंतर्गत बंड ( अमरिंदर सिंग- सिद्धू वाद ) सुरू असून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे. ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. आज सायंकाळी विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलविली असून त्याकडे लक्ष लागले आहे.
या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत अमरिंदर सिंग यांच्या जागी नवा नेता निवडला जातो की, वादावर तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणारे अमरिंदर सिंग आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले आक्रमक असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सध्या विस्तव जात नाही.
याआधी सरकारमधून बाहेर राहून सिद्धू अमरिंदर यांच्यावर हल्ला करत होते आता थेट प्रदेशाध्यक्ष बनविल्यानंतर त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येत आहे ( अमरिंदर सिंग- सिद्धू वाद ).
सिद्धू आणि त्यांचे समर्थक अमरिंदर यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी उतावळे झाले आहेत.
अमरिंदर यांनी थेट काँग्रेस नेतृत्वाला आव्हान दिले आहे. याची चुणूक जालियनवाला बाग सुशोभिकरण मुद्द्यावरून दाखवून दिली आहे.
जालियनवाला बागेत जनरल डायर याने केलेल्या गोळीबाराच्या खुणा पुसून या परिसराचा विकास केला आहे.
यावरून पंजाबमध्ये तीव्र भावना आहेत. त्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
तर नंतर लगेचच अमरिंदर सिंग यांनी , सुशोभिकरणात काहीच चूक वाटत नसल्याचे सांगितले.
त्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वाला आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
जर तुम्ही मला साइड ट्रॅक करत असाल तर मी भाजपला जवळ करेन असा थेट संदेश नसला तरी तसे ध्वनित करणारी ही कृती आहे.
काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरिश रावत यांनी ट्विट करून आजच्या बैठकीची घोषणा केली आहे.
त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची तातडीनं बैठक घ्यावी, असं काही आमदारांनी सूचवलं होतं.
त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता पंजाब प्रदेश कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे.
सर्व काँग्रेसच्या सर्व आमदारांनी तिथं उपस्थित राहावं,'
हेही वाचा :