पुणे महापालिकेत आघाडी झाली, तरच उंचावेल शिवसेनेचा आलेख

पुणे महापालिकेत आघाडी झाली, तरच उंचावेल शिवसेनेचा आलेख
Published on
Updated on

पुणे : ज्ञानेश्वर बिजले

भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीची साथ आणि एकसदस्यीय प्रभाग यांची साथ मिळाल्याने एकेकाळी नगरसेवकांची संख्या वीसपर्यंत वाढविण्यात यश मिळालेल्या शिवसेनेला गेल्या निवडणुकीत तब्बल चारसदस्यीय प्रभागांमध्ये युतीविना एकटेच लढावे लागले. त्यामुळे त्यांची संख्या निम्म्याने घसरून दहावर आली. आता येत्या निवडणुकीत पुन्हा तीन सदस्यांच्या प्रभागांत भाजपविना लढावे लागणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरची आघाडी त्यांना तारू शकेल.

पुणे महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी पुण्यात महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास शिवसेनेला त्याचा फायदाच होईल. अर्थात, आघाडी न झाल्यास नाईलाजाने शिवसेनेला स्वबळावर लढावे लागेल. तशा परिस्थितीत गेल्या निवडणुकीत थोडक्या मतांनी गमावलेल्या अठ्ठावीस जागांवरच त्यांचा भरवसा असेल. भाजप-शिवसेना युतीच्या 25 वर्षांच्या काळात पुण्यातील वेगवेगळ्या भागातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले.

समर्पित कार्यकर्त्यांची फळी तरीही…!

शहराच्या काही भागात त्यांची ताकद आहे, समर्पित कार्यकर्त्यांची फळी आहे. पंचवीस वर्षांपूर्वी राज्यात युतीची सत्ता आली, तेव्हा पुणे शहरातील सहापैकी तीन आमदार शिवसेनेचे होते. मात्र, गेल्या सात वर्षांत भाजप वाढल्यानंतर, शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या. 2014 मध्ये युती तुटल्यानंतर त्यांचे दोन्ही आमदार पराभूत झाले. आठही जागा भाजपने जिंकल्या. 2019 मध्ये युती झाल्याने शिवसेनेला पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातच उतरता आले नाही. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीतही अचानकपणे चार नगरसेवकांचा एक प्रभाग या नव्या रचनेने शिवसेनेची वाताहत झाली. स्वतःच्या वॉर्डात ताकद असली, तरी प्रभागातील लगतच्या वॉर्डात ताकद नसल्याने, अनेक नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले. त्यातही अन्य पक्षातून ऐनवेळी आलेल्या तिघांचा समावेश आहे.

राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे आहे. पक्षाची स्थिती भक्कम करण्यासाठी शिवसेनेने आता पुणे जिल्ह्याची सूत्रे खासदार संजय राऊत, सचिन अहिर, आदित्य सरपोतदार यांच्याकडे सोपविली आहेत. त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रभागांचा आढावा घेतला. शिवसेना व अन्य पक्षांची ताकद, प्रभागनिहाय निवडून येण्याची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार यांची माहिती त्यांनी जमा केली. महामगरांमध्ये भाजपची पारंपरिक ताकद आहे. गेल्या निवडणुकीत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपच्या हाती गेली. ती पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला पुण्यात मित्रपक्षांची अधिक गरज आहे. ती गरज शिवसेना भागवू शकते. शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई, ठाणे येथील महापालिका महत्त्वाच्या आहेत.

तिन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपसमोर आव्हान

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्यास ते भाजपपुढे मोठे आव्हान उभे करू शकतील. शिवसेनेनेही पुण्यात माफक अपेक्षा ठेवल्याने, त्यांना आघाडीत त्यांच्या अपेक्षेएवढ्या जागा निवडणूक लढविण्यासाठी मिळू शकतील. 40 ते 50 जागांवर निवडून लढवून वीसपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले, तरी महापालिकेच्या राजकारणात त्यांना महत्त्व मिळेल. हे लक्षात घेत शिवसेना नेतृत्व व्यूहरचना आखत आहे. शिवसेनेचे दहा नगरसेवक असले तरी, 28 जागा त्यांनी थोडक्या मतांनी गमावल्या. काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ मिळाल्यास त्यांच्या जागा वाढण्यास मदत होईल. स्वतंत्र लढण्याचे ठरविल्यास, कोणत्या प्रभागात तीन नगरसेवकांचे पॅनेल उभे करता येईल, याची चाचपणीही त्यांनी करून ठेवली आहे.

सचिन अहिर म्हणतात, पुण्यात शिवसेनेचा महापौर व्हावा, असे आम्ही म्हणत नाही. पण, नवीन महापौर निवडण्यासाठी शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज लागल्यास, पक्षाचे महत्त्व आपोआप वाढेल. पुण्यात आमच्यापेक्षा मित्रपक्षाला आघाडीची गरज अधिक आहे. निवडणूक मार्च-एप्रिलपर्यंत पुढे जाण्याची शक्यता असल्याने, नवीन प्रभागरचनेनंतरच आघाडीतील नेत्यांची जागावाटपाची बोलणी होतील. समाधानकारक जागा न मिळाल्यास, स्वबळावर लढण्याची तयारीही आम्ही केली आहे.

पुणेकरांनी एकदा संधी द्यावी

भाजपने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या पाच वर्षांत विकासाची कामे केली नाहीत. मात्र, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांना बोलावून ते विविध कार्यक्रम करणार आहेत, असे शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी सांगितले. आम्हीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटनाचे कार्यक्रम करणार आहोत. मुंबईप्रमाणे पुण्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी शिवसेनेला एकदा संधी द्यावी, अशी विनंती पुणेकरांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्ष – सेनेचे नगरसेवक

1992 – 5
1997 – 15
2002 – 20
2007 – 20
2012 – 15
2017 – 10

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news