Agniveer Scheme : अग्निवीर शहीद झाल्यानंतर सरकार किती भरपाई देते; जाणून घ्या अग्निपथ योजनेचे संपूर्ण नियम

Agniveer Scheme : अग्निवीर शहीद झाल्यानंतर सरकार किती भरपाई देते; जाणून घ्या अग्निपथ योजनेचे संपूर्ण नियम

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लष्करात 'अग्निपथ योजना' ही सैन्य भरतीची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या नव्या नियमांबाबत नेहमीच चर्चा होत असते. आज सियाचीन ग्लेशियरमध्ये कर्तव्य बजावत असताना अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते हे शहीद झाले. गवते हे शहीद झालेले पहिले अग्निवीर आहेत. एका अग्निवीरच्या मृत्यूवर सरकार कुटुंबाला किती मदत करते, याबाबत नियम जाणून घेऊया…

संबंधित बातम्या : 

अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर चार वर्षांसाठी लष्कराचा भाग बनतो. चार वर्षांनंतर अग्निवीर सामान्य जीवनात परततो. विशेष म्हणजे या चार वर्षांनंतर अग्निवीरला संरक्षण दलात सामील होण्याची संधी देण्यात आली आहे. नुकतेच ४ वर्षे पूर्ण केलेल्या बॅचमधील २५ टक्के सैनिकांना भारतीय लष्करात भरती करण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण निवड प्रक्रियेचे अधिकार सरकारकडे आहेत.

पगार आणि इतर पॅकेजेस

सुरुवातीच्या वर्षात अग्निवीरला दरमहा ३० हजार रुपये मिळतात. यापैकी २१ हजार रुपये त्यांच्या हातात येतात आणि ३० टक्के म्हणजे सुमारे ९ हजार रुपये कॉर्पस फंडात जातात. या निधीत सरकार दरमहा नऊ हजार रुपयांचे देते. दुसऱ्या वर्षापासून अग्निवीरला मासिक पगार ३३ हजार रुपये मिळतो. दर महिन्याला त्याला २३ हजार १०० रुपये मिळतात आणि ९ हजार ९०० रुपये कॉर्पस फंडात जातात. तिसऱ्या वर्षी पगार दरमहा ३६ हजार ५०० रुपये होतो आणि १० हजार ९५० रुपये कॉर्पस फंडात जातात. त्याच्या हातात २५ हजार ५५० रुपये मिळतात. शेवटच्या वर्षी पगार ४० हजार रुपये होतो, त्यातील कॉर्पस फंड १२ हजार रुपये असतो तर अग्निवीरला २८ हजार रुपये मिळतात. अग्निवीरचे प्रत्येक महिन्याला कॉर्पस फंडात जेवढे पैसे जातात तेवढीच रक्कम सरकार देते. चार वर्षांच्या सेवेच्या समाप्तीनंतर ही रक्कम १० लाख रुपयांपर्यंत पोहोचते ती दिली जाते.

जीवन विमा संरक्षण

अग्निवीर म्हणून ४८ लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण दिले जाते.

अपंगत्व आले तर…

अशा अग्निवीरला संरक्षण दलाच्या सेवेतून मुक्त केले जाते आणि एकरकमी भरपाई मिळते. वैद्यकीय अधिकारी अपंगत्वाच्या टक्केवारीच्या आधारावर भरपाई ठरवतात. १०० टक्के अपंगत्वासाठी ४४ लाख रुपये, ७५ टक्के अपंगत्वासाठी २५ लाख आणि ५० टक्के अपंगत्वासाठी १५ लाख रुपये दिले जातात.

हा नियम जाणून घ्या

अग्निवीरांना भविष्य निर्वाह निधी किंवा पीएफमध्ये पैसे जमा करण्याची गरज नाही. याशिवाय त्यांना ग्रॅच्युइटी किंवा कोणत्याही प्रकारची पेन्शन सुविधा मिळत नाही. तसेच सेवा निधीवर आयकर आकारला जात नाही.

शहीद झाल्यास…

जर एखादा अग्निवीर कर्तव्यावर असताना शहीद झाला तर त्याला ४८ लाख रुपयांचे विमा संरक्षण, ४४ लाख रुपये अनुग्रह रक्कम, चार वर्षांचा सेवा निधी आणि कॉर्पस फंड मिळतो. विशेष म्हणजे त्यात काही व्याजही समाविष्ट आहे. जर एखाद्या अग्निवीराचा ड्युटीवर नसताना मृत्यू झाला तर त्याला ४८ लाख रुपयांचे विमा संरक्षण देखील दिले जाते आणि मृत्यूच्या तारखेपर्यंत सेवा निधी आणि कॉर्पस फंड दिला जातो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news